हिंदु हेल्प लाईनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार….
निपाणी : निपाणी येथे दि. प्लस हॉल मध्ये निपाणी आणि निपाणी तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवलेल्या 60 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी इस्कॉनचे पुणे (निगडी) येथील प.पू. राम गोविंद प्रभुजी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी,प.पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा व निपाणी सर्कलचे सीपीआय बी. एस. तळवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह,भगवद्गीता देवून आशीर्वादरुपी सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम विद्येची देवता सरस्वती देवीचे फोटो पूजन सर्व करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली निपाणीचे सीपीआय बी. एस. तळवार यांनी मनोगत व्यक्त करतेवेळी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासा सोबत मैदानी खेळाकडे ही लक्ष दिले पाहिजे. बुद्धी सोबत मन आणि मनगटही बलशाली झाले पाहिजे. शिक्षणामध्ये उतुंग यश प्राप्त झाल्यावर आपल्या समाज आणि राष्ट्र या विषयी मोठी जबाबदारी वाढते. आपल्या प्रगती सोबत समाज आणि राष्ट्राची प्रगती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे तसेच तरुणांनी व्यसन, वाईट गोष्टीपासून दूर राहून राष्ट्र निर्मितीच्या कार्यात योगदान द्यावे.
यावेळी प.पू.राम गोविंद प्रभुजी यांनी प्रमुख मार्गदर्शन देते वेळी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञानग्रहण अवस्थेत फक्त ज्ञानग्रहण करावे. यावेळी टीव्ही मोबाईल यापासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करावा व सोशल मीडियावर आवश्यक तेवढेच सहभागी रहावे. या वयात आपले सर्व लक्ष शिक्षणावर केंद्रित करावे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना आपली भारतीय संस्कृती आपले भारतीय विचार आपल्या आचार तसेच संत महंत क्रांतिकारक यांच्या चरित्र आणून देऊन त्यांच्याकडून ते वाचून घेऊन त्याप्रमाणे आचरण करायला शिकवावे असे मार्गदर्शन करतेवेळी प.पू. राम गोविंद प्रभुजी यांनी मत व्यक्त केले.
यावेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी सदगुरू सच्चिदानंद बाबा यांनी जो उपक्रम चालू केला आहे त्या उपक्रमाचे कौतुक केले. असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले पाहिजे तसेच शिक्षण घेते वेळी कोणत्याही विद्यार्थ्यांना कसलीही अडचण असेल तर ती अडचण दूर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे सर्व साधुसंत महंत उभे राहतील असा संदेश प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांनी दिला. प. पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा बोलते वेळी सांगितले की, विद्यार्थ्यांनी नेहमीच आशावादी रहावे व पालकांनी मुलांकडून जबरदस्तीची अपेक्षा करू नये पालकांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांसोबत व त्याच्या मित्रासोबत नेहमीच संपर्कात राहिले पाहिजे व विद्यार्थ्यांना विज्ञानासोबत अध्यात्माचेही महत्व समजावून सांगितले पाहिजे असे मत प. पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा यांनी व्यक्त केले.
हिंदू हेल्प लाईनचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सांगितले की, निपाणी मधील साधुसंतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू हेल्प लाईनच्या वतीने मागील वर्षापासून परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेऊन पास झालेल्या अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा साधू संत महंत यांच्या हस्ते आशीर्वाद रुपी सत्कार करून गौरवण्यात आले आहे. यावेळी हिंदू हेल्प लाईनच्या वतीने निपाणी आणि परिसरात विविध उपक्रम राबवले जात असताता असे सांगितले.
यावेळी अँड. बेंद्रे मॅडम, सुचित्रा ताई कुलकर्णी यांनीही गुणवंत विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरद सर तर आभार सुनील जनवाडे यांनी मानले..हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इस्कॉन सह सदगुरू सच्चिदानंद महाराज सेवा कमेटी, यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमा मध्ये सधर्म चारिटेबल ट्रस्ट सेवा, हिंदू हेल्प लाईन निपाणी, गोरक्षण सेवा समिती निपाणी व सकल हिंदू समाज निपाणी यांचे कार्यकर्ते भक्त मंडळी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.