Monday , June 1 2026
Breaking News

आडीचा प्रतिक मोरे ठरला गावात पहिला नौसैनिक

Spread the love

 

शिक्षकाच्या मुलाची भारतीय नौसेनेत भरारी

निपाणी (वार्ता) : आडी (ता.निपाणी) येथील प्रतिक सिद्धू मोरे याची भारतीय नौसेनेत नुकतीच निवड झाली आहे. भारतीय नौसेनेत भरती होणारा प्रतिक हा आडी गावातील पहिलाच युवक असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिकचे प्राथमिक शिक्षण आडी मराठी मुलांची शाळा, सौंदलगा हालसिद्धनाथनगर येथे झाले. पुढे त्याने सौंदलगा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर निपाणी येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच प्रतिकने कठोर परिश्रम, शिस्त आणि देशसेवेची जिद्द कायम ठेवली. भारतीय नौसेनेत निवड
होण्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक व लेखी चाचण्यांमध्ये प्रतिकने यशस्वी कामगिरी केली. त्याच्या या यशामागे कुटुंबीयांचेमार्गदर्शन, शिक्षकांचे प्रोत्साहन आणि स्वतःची मेहनत महत्त्वाची ठरली.
प्रतिकचे वडील सिद्धू मोरे हे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी मुलाला शिक्षणासोबतच शिस्त, मूल्ये आणि देशप्रेमाचे संस्कार दिले. प्रतिकच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून ग्रामस्थ, शिक्षक, मित्रपरिवार व नातेवाईकांनी त्याचे कौतुक केले आहे. प्रतिकच्या या यशामुळे आडी परिसरातील युवकांना प्रेरणा मिळाली असून देशसेवेच्या क्षेत्रात जाण्याचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.
——————————————————————
‘मुलाने भारतीय नौसेनेत निवड मिळवली, हे आमच्यासाठी शब्दांत व्यक्त करता न येणारे समाधान आहे. शिक्षणासोबतच शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम हे संस्कार दिले. त्याचेच हे फलित आहे. प्रतिकने स्वतःच्या मेहनतीने हे यश मिळवले असून तो इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.’
सिद्ध मोरे, प्रतिकचे वडील, आडी

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *