Friday , April 17 2026
Breaking News

सर्वे क्रमांक १४३/२ मधील सुधारित लेआउट रद्द

Spread the love

 

माजी नगरसेवकांची माहिती; नगर योजना अधिकाऱ्यांचा निर्णय

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ऐतिहासिक तंबाखू आंदोलनात बळी पडलेल्या हुतात्मा शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ आंदोलननगर येथे हुतात्मा शेतकरी स्मारक उभारण्यात आले आहे. येथे शेतकरी भवन बांधण्यासाठी जागा देण्याची मागणी हुतात्मा शेतकरी स्मारक समितीने केली आहे. परंतु सदरसर्वे क्रमांक १४३/२ मध्ये सुधारित लेआउट करून जागेत निवासी प्लॉट पाडण्याचे काम सुरू होते. त्याला नगरपालिकेतील विरोधी नगरसेवकांनी विरोध करत सदर लेआउट रद्द करण्याची मागणी नगरपालिका आयुक्तांसह जिल्हा योजना संचालकांकडे केली होती. त्यावर सखोल चौकशी करून योजना अधिकाऱ्यांनी या सर्वे क्रमांकामधील नवीन सुधारित लेआउट रद्द करून तीन एकर जागेचा निर्णय नगरपालिकेच्या बाजूने दिल्याची माहिती माजी नगरसेवक रवींद्र शिंदे यांच्यासह नगरसेवकांनी गुरुवारी (ता.५) दिली.

जागेसंदर्भात संदर्भातील तत्कालीन विरोधी गटनेते सर्फराज बडेघर, नगरसेवक दत्ता नाईक, अनिता पठाडे, रवींद्र शिंदे, राणी शेलार, शौकत मनेर, विनायक वडे, संजय पावले, संतोष माने, शांती सावंत, दिपाली गिरी, उपासना गारवे यांनी सुधारित लेआउट रद्द करण्याची मागणी केली होती. सदरची जागा ही निपाणी नगरपालिकेला नागरी सुविधा व उद्यानासाठी राखीव आहे. याबाबतची कागदपत्रे ही जिल्हा योजना निर्देशाकडे सादर करण्यात आली होती.
तरीही या जागेवर प्लॉट पाडण्याचे काम सुरूच होते. अखेर नगरसेवकांनी योजना अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी केली होती. तरीही संबंधितांनी नकाशात बदल करून तात्पुरती मंजुरी मिळविली होती. त्या विरोधातही नगरसेवकांनी पाठपुरावा करून जागा नगरपालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. त्यानुसार नगरपालिकेच्या पत्रानुसार
या प्रकरणाची सखोल तपासणी करून हा निर्णय दिला आहे. आता यापुढे काळात नगरपालिकेने ही जागा ताब्यात घेऊन हुतात्मा शेतकरी भवनाला देण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. यावेळी संजय सांगावकर, दत्ता नाईक दिलीप पठाडे, शौकत मनेर यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.
——————————————————————–
‘लेआउट करणाऱ्या संबंधितांनी सदरची जागा आपली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे हुतात्मा स्मारक होण्यासाठी आपणास सह प्रतिनिधींनी शेतकरी स्मारकाला जागा मिळण्यासाठी संबंधितांना भेटलो होतो. आता नवीन लेआउट रद्द झाले असून नगरपालिकेने शेतकरी स्मारकासाठी जागा द्यावी, यासाठी आपण मागणी करणार असल्याचे माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *