Monday , May 25 2026
Breaking News

ऊसतोड कामगारांची उचल फिटलीच नाही

Spread the love

 

यंत्रापुढे हतबल; मुकादम, वाहन मालक आले अडचणीत

निपाणी (वार्ता) : काही वर्षांपूर्वी उसाच्या फडात कोयत्याचा खणखणाट आणि मजुरांच्या मुलाबाळांचा किलबिलाट महिनोनमहिने ऐकू येत होता. पण काळ बदललि असून आता ऊसतोडणी यंत्रांचा (हार्वेस्टर) धडधडाट वाढला आहे. ज्या कामाला मजुरांची अख्खी टोळी तीन-चार दिवस लावायची, ते काम आता अवघ्या पाच तासांत फत्ते होत आहे. यंत्राच्या या वेगवान प्रहारामुळे यंदा निपाणी सीमा भागातील ऊस गाळपाचा हंगाम जेमतेम ८० ते १९० दिवसांत आटोपला आहे. परिणामीअंगावर घेतलेली उचल न फिटल्याने हजारो ऊसतोड कामगारांना रिकाम्या हाताने आणि कर्जाच्या ओझ्याखालीच आपल्या गावी परतावे लागले आहे.
निपाणीपरिसरातील वेदगंगा आणि दूधगंगाऊस नदीकाठच्या पट्ट्यात यंदा उसाचे मोठे गाळप होईल, अशी आशा मजुरांना होती. मात्र कारखानदारांनी मजुरांच्या टोळ्यांऐवजी यंत्रांना प्राधान्य दिले. जिथे मजुरांना एक एकर तोडणीसाठी तीन दिवस लागतात, तिथे मशीनने ४-५ तासांत काम उरकले. त्यामुळे यंदाचा हंगाम अवघ्या ८० ते ९० दिवसांचाच झाला. प्रत्येक वाहनाचे टनेज १५०० ते २००० टनाच्या आतच मर्यादित राहिल्याने मजुरांनी घेतलेली उचल फिटू शकली नाही. आता हंगाम संपला तरी ३० ते ५० हजार रुपये मजुरांच्या अंगावर फिरत असल्याने उरलेले आठ महिने मोलमजुरी करूनच त्यांना संसाराचा गाडा ओढावा लागणार आहे.
——————————————————————-
वाहन मालक, मुकादम संकटात
गेल्या काही वर्षांत मजुरांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी कारखान्यांनी यंत्रांचा वापर वाढवला आहे. मात्र त्यामुळे ज्या वाहन मालकांनी मजुरांना १०-१२ लाख रुपये उचल दिली होती,त्यांचे गणित कोलमडले आहे. मजुरांच्या हाताला कामच न मिळाल्याने ही रक्कम वसूल कशी करायची, हा मोठा प्रश्न आहे.
——————————————————————–‘यावर्षी ऊसतोडणी मजुरांना ११ लाख रुपये उचल दिली होती. हिशोब केल्यानंतर ४ ते ५ लाख रुपये अद्याप फिरत आहेत. उर्वरित रक्कम मजुरांकडेच राहिली आहे. पुढील वर्षी हे मजूर तोडणीसाठी येतील की नाही, याची शाश्वती नाही. तरीही पुढच्या वर्षीसाठी त्यांना आणखी रक्कम द्यावी लागणार आहे.
-किरण धोतरे, वाहन मालक, मुकादम, बीड

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *