Sunday , August 16 2026
Breaking News

निपाणीजवळील एनएच-48 वरील कोसळलेल्या संरक्षक भिंतीची दिल्लीतील तांत्रिक पथकाकडून पाहणी; काम पुन्हा सुरू होणार

Spread the love

 

निपाणी : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (NH-48) सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयाजवळ कोसळलेल्या संरक्षक (रिटेनिंग) भिंतीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) दिल्ली येथील तांत्रिक पथकाने शनिवारी सखोल पाहणी केली. २९ जुलै रोजी भिंतीचा एक भाग कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

NHAI चे बंगळुरू विभागाचे महाव्यवस्थापक ब्रह्मणकर यांनी सांगितले की, दिल्लीतील तज्ज्ञ पथकाने अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने भिंतीची गुणवत्ता आणि बांधकामाची तपासणी केली. घटनास्थळावरील तांत्रिक माहिती संकलित करण्यात आली असून, त्याचे विश्लेषण केल्यानंतर अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.

भिंत कोसळल्यानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आलेले महामार्गाचे बांधकाम आता पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्राथमिक तपासणीत, मुसळधार पावसामुळे भरावामध्ये पाणी झिरपल्याने मातीची धूप होऊन संरक्षक भिंत कोसळल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उड्डाणपुलाच्या अ‍ॅप्रोच भरावाचे काम सुरू असतानाच घडल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेनंतर NHAI ने संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. प्रकल्प संचालक, ब्रिज अभियंता आणि निवासी अभियंता यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले असून, संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गुणवत्ता तपासणीचा अंतिम अहवाल आल्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही NHAI ने स्पष्ट केले.

या घटनेमुळे सहापदरीकरण प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच नव्याने उभारलेली संरक्षक भिंत कोसळल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

स्तवनिधीत स्वातंत्र्यदिन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित बाल विकास मंदिर, पी. जी. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *