Sunday , August 16 2026
Breaking News

उंदरवाडीत हरित परिवर्तनाची मुहूर्तमेढ!

Spread the love

 

आरंभ व भूमी वात्सल्य फाउंडेशनचा उपक्रम; एक पेड माँ के नाम’ अभियानाचा प्रारंभ

निपाणी (वार्ता) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत उंदरवाडी येथील विद्यामंदिर शाळेत ‘आरंभ फाउंडेशन’ आणि ‘भूमी वात्सल्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरणपूरक अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक, पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले यांनी ५१ वृक्षरोपे भेट देत पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला भक्कम बळ दिले.
प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व वृक्षरोपे देऊन पर्यावरणपूरक सत्कार करण्यात आला.आरंभ आणि भूमी वात्सल्यच्या एकजुटीतून उंदरवाडीत हरित क्रांतीची नांदी होते.
नामदेवराव चौगुले म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही केवळ जबाबदारी नसून पुढील पिढ्यांप्रती आपली नैतिक बांधिलकी आहे. गेली २६ वर्षे पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्य करताना सुप्रसिद्ध अभिनेते ‘सह्याद्री देवराई’चे संस्थापक सयाजी शिंदे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यात आणि राज्यभरातील अनेक पर्यावरणप्रेमीं सोबत कार्य करण्याची संधी मिळाली. आरंभ फाउंडेशनच्या सहकार्याने उंदरवाडीत पर्यावरण चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याचे भाग्य लाभले. आम्ही भेट दिलेली ५१ वृक्षरोपे ही केवळ रोपे नसून हरित, समृद्ध आणि शाश्वत भविष्यासाठीचा संकल्प आहे. आरंभ फाउंडेशन आणि भूमी वात्सल्य फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून उंदरवाडी पर्यावरण संवर्धनाचा राज्यासाठी आदर्श ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात घाटगे उद्योग समूहाचे सुरेश घाटगे, सैनिकरत्न पुरस्कार विजेते व सैनिक बँक कुर्लीचे अध्यक्ष राजेंद्र चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबईचे अरविंद मोरे, कौंदाडे प्लॉटचे डेव्हलपर सचिन कौंदाडे, आरंभ फाउंडेशनचे रणजित पाटील व सूरज घारे यांचा शाल व वृक्षरोपे देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हा पदवीधर संघटनेचे अध्यक्ष प्राथमिक शिक्षक बॅंक तज्ञ संचालक सुकुमार पाटील यांनी वृक्षारोपण उपक्रमात सक्रिय सहभाग घेत, नामदेवू चौगुले यांच्या पर्यावरण कार्यातून प्रेरणा घेऊन उंदरवाडीत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची चळवळ उभारण्याची ग्वाही दिली.
सैनिकरत्न पुरस्कार विजेते राजेंद्र चौगुले यांनी ‘एक व्यक्ती, एक झाड’ हा संकल्प प्रत्येक नागरिकाने स्वीकारल्यास पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळेल, असे सांगत नामदेव चौगुले यांच्या पर्यावरण कार्याचे विशेष कौतुक केले.
यावेळी प्रदीप पाटील, सूरज घारे, रणजित पाटील, गणेश कांबळे, सुकुमार पाटील, एस. के. पाटील, बी. वाय. कांबळे, जयश्री कांबळे, विद्या खाडे, अनिल शेणवी, डी. एम. कुंभार, दीपक सुतार, रेणू सुतार, मारुती कदम यांच्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. ए. एल. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

स्तवनिधीत स्वातंत्र्यदिन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित बाल विकास मंदिर, पी. जी. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *