

निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर विविध समाज घटकांच्या विकासाच्या अपेक्षांना नवी दिशा मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. वडर-कोरवी समाजालाही यापासून अपेक्षा असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विकास निगमाची स्थापना करावी. शिवाय पुरेसा निधी आणि प्रभावी प्रतिनिधित्व आवश्यक असल्याचे मत वडर समाजाचे राज्य संचालक व माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर-पवार यांनी बैठकीत व्यक्त केले.
वडर म्हणाले, वडर-कोरवी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र विकास निगम स्थापन करून त्यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडेही निवेदन देण्यात आले होते. मंत्रिमंडळात समाजाला पुन्हा प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे या मागण्यांची पूर्तता होण्याची आशा निर्माण झाली आहे.
समाजाच्या विकासासाठी केवळ आश्वासने पुरेशी नाहीत. ठोस निर्णय, आर्थिक तरतूद आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. मंत्रिमंडळातसमाजाचे प्रतिनिधित्व वाढल्याने वडर-कोरवी समाजासह इतर मागास समाजघटकांच्या विकासाला गती मिळेल.कामगार मंत्री म्हणून सातत्याने कार्यरत असलेले संतोष लाड यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांच्या माध्यमातून कामगार वर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळण्याबरोबरच मराठा समाजाच्या विकासालाही चालना मिळेल.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विविध विकासकामांना वेग आला असून, युवकांना संघटनात्मक कार्यात सहभागी करून घेण्याचे कामही प्रभावीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या माध्यमातून कागवाड, चिक्कोडीसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोचणार आहेत.
ग्रामीण व वंचित समाजघटकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकासाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता आहे. भविष्य काळात विकासकामांना आणखी गती मिळेल, असा विश्वासही राजेंद्र वडर यांनी व्यक्त केला. यावेळी बाबलेश शेट्टी, ओंकार वडर यांच्यासह समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta