
निपाणी (वार्ता) : सीमावादामुळे कर्नाटक भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना स्वतःच्या मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी आणि पुढील उच्च शिक्षणासाठी दोन्ही राज्यांच्या प्रशासकीय पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय व शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कागल येथे भेट घेऊन समस्या मांडल्या. मंत्री मुश्रीफ यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्याची ग्वाही दिली.
सीमा भागातील विशेषतः महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळांमध्ये कन्नड भाषा सक्तीची केल्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना ती शिकणे कठीण जात आहे. विद्यार्थ्यांना मराठी माध्यमात शिकतानाच प्रशासकीय गरजांसाठी कन्नड भाषेचाही अभ्यास करावा लागत आहे.
मराठी माध्यमाची पाठ्यपुस्तके वेळेवर उपलब्ध होत नाहीत. जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला किंवा उत्पन्न प्रमाणपत्र मिळवताना भाषेच्या करारामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
कर्नाटक सरकारचे शैक्षणिक पोर्टल प्रामुख्याने कन्नड किंवा इंग्रजीत असल्याने मराठी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात उच्च शिक्षणासाठी येताना सीमाभागातील विद्यार्थ्यांना ‘परराज्यातील विद्यार्थी’ (ओएमएस) म्हणून गृहीत धरले जाते.त्यामुळे त्यांना कमी जागा उपलब्ध होतात. महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लागणारे डोमिसाईल प्रमाणपत्र मिळवण्यात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. बस पाससाठीही समस्या होत आहे. सीमा भागातील मराठी शाळांमध्ये मराठी भाषिक शिक्षकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. अनेक मराठी शाळांना कर्नाटक सरकारकडून योग्य प्रमाणात आर्थिक अनुदान मिळत नसल्याने शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सीमावर्ती भागातील शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि क्रीडांगणे यांसारख्या आधुनिक सुविधांची कमतरता आहे. महाराष्ट्र किंवा कर्नाटक सरकारच्या स्पर्धा परीक्षांची माहिती योग्य वेळी आणि मातृभाषेत न मिळाल्यामुळे विद्यार्थी मागे पडत असल्याची ही खंत राजू पोवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर व्यक्त केली. सविस्तर झालेल्या चर्चेनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी समस्या तात्काळ सोडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रयत संघटने तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सीमा भागातील विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta