
बंगळूर : १ जुलैपासून मनरेगा ऐवजी लागू करण्यात आलेल्या ‘व्हीबीजी रामजी’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून न देता तसेच मानवदिवस निर्मितीत निष्काळजीपणा करणाऱ्या ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांवर (पीडीओ) कठोर कारवाई करण्याचे निर्देश ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिले आहेत.
विकाससौध येथे गुरुवारी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सांगितले की, जुलै २०२५ मध्ये मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करून मानवदिवस निर्माण करणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये जुलै २०२६ मध्ये एकाही लाभार्थ्याला काम देण्यात आले नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी.
बंगळुर परिसरात ३८२ रुपये मजुरीवर काम करण्यास कामगार पुढे येत नसतील, अशी परिस्थिती असू शकते. मात्र, ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना रोजगार न देणे हे ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांचे कर्तव्यच्युती मानली जाईल. अशा अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवून निष्काळजीपणा किंवा उदासीनता सिद्ध झाल्यास त्यांना निलंबित करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी विभागाचे सचिव आणि आयुक्तांना दिले.
खांड्रे म्हणाले की, ‘व्हीबीजी रामजी’ योजनेअंतर्गत दररोज ५ लाख मानवदिवस निर्माण होईपर्यंत विभागाचे सचिव आणि आयुक्त यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) दररोज व्हर्च्युअल बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घ्यावा. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यकारी अधिकारी (ईओ) आणि ग्रामपंचायत विकास अधिकारी (पीडीओ) यांच्यासोबत नियमित बैठक घेऊन कामाचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला विभागाचे सचिव समीर शुक्ला, डी. रंदीप, आयुक्त दिव्या प्रभू, फौजिया तरन्नुम तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta