Monday , August 17 2026
Breaking News

कर्नाटक सरकारचा कडक निर्णय : ग्रामपंचायत हद्दीत फक्त मातीच्या गणेशमूर्तींनाच परवानगी

Spread the love

 

बंगळूर : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना व विसर्जनासाठी पर्यावरणपूरक, रंग न लावलेल्या मातीच्या गणेशमूर्तींनाच परवानगी देण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ईश्वर खांड्रे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर मंत्री खंड्रे यांनी विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींच्या विसर्जनाला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने नागरिकांनी मातीच्या गणेशमूर्तींचीच पूजा करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच ग्रामपंचायत क्षेत्रात पर्यावरणपूरक मातीच्या गौरी व गणेशमूर्तींचीच स्थापना आणि विसर्जन करण्यास परवानगी द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

पीओपी मूर्तींवर कठोर निर्बंध

गणेशोत्सवापूर्वीच पीओपी गणेशमूर्तींचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. उत्सवादरम्यान नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याचीही दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

याशिवाय, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने पंचायत स्तरावर पीओपी मूर्तींमुळे होणाऱ्या पर्यावरणीय दुष्परिणामांबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पीओपी मूर्ती पर्यावरणासाठी घातक

पीओपीच्या मूर्ती कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेटच्या पावडरपासून तयार केल्या जातात. त्यामध्ये सल्फर, जिप्सम, मॅग्नेशियम तसेच विविध रासायनिक रंगद्रव्यांचा वापर केला जातो.

या मूर्तींना लावल्या जाणाऱ्या रंगांमध्ये पारा, कॅडमियम आणि शिसे यांसारखे धोकादायक जड धातू असण्याची शक्यता असते. त्यामुळे तलाव, नद्या, विहिरी आणि इतर जलस्रोतांमध्ये पीओपी मूर्तींचे विसर्जन झाल्यास हे घातक घटक पाण्यात मिसळतात. यामुळे जलप्रदूषण वाढून जलचरांचे मोठे नुकसान होते, तसेच मानव आणि प्राण्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात, असे मंत्री ईश्वर खांड्रे यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक

Spread the love  बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *