
पाणी पातळी ४२.१ फुटावर : शिरगुप्पी ओढ्यातून येणाऱ्या पाण्याचा परिणाम
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे निपाणीची जीवनदायिनी असणाऱ्या जवाहर तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शनिवारी (ता.८) पाणी पातळी ४२.१ फुट इतकी झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मान्सून असाच राहिल्यास आठवडाभरात तलाव भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी वेळेत मान्सून सुरू झाल्याने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दोन वेळा तलाव भरून ओव्हर फ्लो झाला होता. त्यानंतर सलग चार दिवस पाणी तलावाबाहेर पडत होते. आता सुरू असलेल्या पावसामुळे यंदाच्या हंगामात लवकर तलाव भरून शहराचा पाणी प्रश्न निकालात निघण्याची अशा व्यक्त केली जात आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शिरगुप्पीसह परिसरातील पाणी ओढ्याद्वारे तलावात पाण्याचा येत आहे. शिवाय वेदगंगा नदीतील पाणी पातळीही वाढली आहे. यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पडणा-या पावसामुळे तलाव ओव्हर फ्लो होऊन यंदा तरी शहरवासियांना २४ तास पाणी मिळणार का असा प्रश्न शहरवासीयातून विचारला जात आहे.
जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील डोंगर भागातून ओढ्यांचे पाणी तलावात मिसळत आहे. त्यामुळे झपाट्याने पातळीत वाढ होत आहे. गतवर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्याने २२ जुलैला जवाहर तलाव ओसंडून वाहू लागला होता. यंदा तलावातील पातळी कमी असल्याने महिन्यापासून पालिकेकडून शहर, उपनगराला ५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तलावाची ४६.१ फूट एक इंच पाणी पातळी झाल्यानंतर पश्चिमेकडील सांडव्यातून पाणी बाहेर पडणार आहे.
——————————————————————-
‘यंदा जुलै च्या प्रारंभापासून मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. आठवड्याभरात जवाहर तलावाची पाणी पातळी वाढली आहे. सध्या तलावात लाल पाणी येत असून फिल्टर करून शहर उपनगरात देण्यात येत आहे.’
–गणपती पाटील, नगरपालिका आयुक्त, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta