Monday , April 20 2026
Breaking News

दुकान बंद करून जाणाऱ्या सराफाला भररस्त्यात लुटले

Spread the love
११ लाखाचा ऐवज लंपास : लुटारू उसाच्या फडात गायब
निपाणी (विनायक पाटील) : जत्राट- जैनवाडी मार्गावर जैनवाडीपासून जवळ एका सराफाला दुकान बंद करून जाताना लुटारूंनी पाठलाग करून लुटल्याची घटना शुक्रवारी (ता.८) सायंकाळच्या सुमारास घडली. धोंडीराम कुसाळे (रा. मांगुर) असे लूट झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडून सोन्याचे साडेबारा तोळ्याचे दागिने व पाच किलो चांदी असा सुमारे ११ लाखाचा ऐवज लुटारूंनी लंपास केला आहे. त्यानंतर संबंधित लुटारू शेजारच्या उसाच्या फडात गायब झाले.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, धोंडीराम कुसाळे यांचे श्रीपेवाडी बस स्थानकावर वडगावे कॉम्प्लेक्स या ठिकाणी सोन्या – चांदीचे दुकान आहे. कुसाळे दिवसभर दुकान सांभाळून सायंकाळी आपल्या दुचाकीवरून आपल्या मांगुर या गावी नेहमीप्रमाणे निघाले होते. गावी जात असताना जत्राट- जैनवाडी मार्गावर गेल्यानंतर जैनवाडीपासून काही अंतरावर दुचाकीवरून पाठलाग करत येणाऱ्या तिघा अज्ञातांनी कुसाळे यांच्या गाडीवर लाथ मारून कोयत्याने वार केला. कोयत्याचा वार हेल्मेटवर झाल्याने कोणतीही दुखापत झाली नाही. पण कुसाळे दुचाकीवरून खाली कोसळले. याचवेळी दुचाकीला असणारी सोन्या – चांदीचे दागिने ठेवलेली बॅग व मोबाईल खाली पडला. याच संधीचा फायदा उठवत दुचाकीवरून खाली उतरलेल्या दोघांनी सदरची बॅग आणि मोबाईल घेऊन उसाच्या शिवारात पोबारा केला. घटनास्थळावर असणाऱ्या नागरिकांनी पाठलाग करताच त्यापैकी शिल्लक राहिलेल्या एकानेही  धूम ठोकली. नागरिकांनी उसाच्या शिवारात शोध घेतला पण ते सापडले नाहीत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस
ठाण्याचे फौजदार अनिलकुमार कुंभार यांच्यासह पोलिसांनी भेट दिली. हॉटेल राजवाडा या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजदेखील पाहिले. पण त्यातून कोणताही सुगावा लागला नाही. घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ग्रामीण भागात भर रस्त्यावर लुटीची घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
—-
पाळत ठेवूनच लुटल्याची चर्चा
मांगुर येथील धोंडीराम कुसाळे यांचे श्रीपेवाडी बसस्थानकावर सराफ दुकान असल्याचे अज्ञात लुटारूंना  समजले होते. शिवाय धोंडीराम यांच्यावर पाळत ठेवून लुटारूंनी हा डाव साधल्याची चर्चा सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *