संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेला लोकांच्या आरोग्याचे देणे-घेणे नसल्याचा आरोप संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी यांनी केला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संतोष मुडशी म्हणाले, गावात सर्वत्र अस्वच्छतेची समस्या आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येतांना दिसत आहे.गावातील बऱ्याच प्रभागातील गटारी कचरा आणि सांडपाण्याने तुंबून राहिलेल्या दिसताहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी सहन करण्याबरोबर डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. गावात जंतूनाशक औषध फवारणीचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून झालेले नाही. त्यामुळे लोकांना डेंग्यू, मलेरिया आजाराचा सामना करावा लागत आहे. गटारीतील कचरा आणि सांडपाण्यामुळे डासांचा उपद्व्याप वाढला आहे. परिणामी डेंग्यू, मलेरियाची रुग्न संख्या वाढतांना दिसत आहे. इकडे पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी आर. बी. गडाद, आरोग्य निरीक्षक तसेच नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव आणि नगरसेवकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गावातील सर्वच प्रभागात पालिकेने जंतूनाशक औषध फवारणीचे काम हाती न घेतल्यास पालिकेवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
