बेंगळुरू : कर्नाटकातील बहुचर्चित म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीमधील घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या वादात अडकले आहेत. आता सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीला पत्र लिहिले असून त्यांना वाटप केलेले १४ भूखंड परत करणार असल्याचे सांगितले आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, माझ्याविरोधात सुरू असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला बळी पडून माझ्या पत्नीने हा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे मी स्वतःच हैराण झालो आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
“पार्वती माझ्याविरुद्ध द्वेषाच्या राजकारणाची बळी पडली असून मानसिक छळ सहन करत आहे. मला माफ करा. मात्र, भूखंड परत करण्याच्या माझ्या पत्नीच्या निर्णयाचा मी आदर करतो. माझी पत्नी पार्वती हिने म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीला जमीन परत केली आहे. राजकीय द्वेष निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षांनी माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी करून माझ्या कुटुंबाला वादात ओढले, हे राज्यातील जनतेलाही माहीत आहे”, असे सिद्धरामय्या म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, ‘मी न झुकता या अन्यायाविरुद्ध लढणार होतो, पण माझ्याविरोधात सुरू असलेल्या राजकीय षडयंत्रामुळे त्रस्त होऊन माझ्या पत्नीने हा भूखंड परत करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मी सुद्धा हैराण झालो आहे. तसेच, माझ्या पत्नीने माझ्या चार दशकांच्या राजकारणात कधीही हस्तक्षेप केला नाही आणि ती फक्त आमच्या कुटुंबापुरतीच मर्यादित राहिली, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.