Monday , May 25 2026
Breaking News

नीट रद्द करून राज्यांना परीक्षा घेण्याचा अधिकार द्या

Spread the love

 

नीट घोटाळ्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन; पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

बंगळूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज बंगळुरात मोठे आंदोलन छेडले. युवक काँग्रेसच्या वतीने फ्रीडम पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात मुख्यमंत्री सिध्दरामय्या, काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान नीट परीक्षेतील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय, सर्वसमावेशक आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी युवक काँग्रेस नेत्यांनी केली.

काँग्रेस नेत्यांनी नीट घोटाळ्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

यंदा देशभरातून २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ आल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. केंद्र सरकारच्या प्रशासकीय अपयशामुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचे त्यांनी म्हटले.

राज्यांनाच अधिकार द्या

आंदोलनात नीट परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे राज्य सरकारांना वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी करण्यात आली. नीट परीक्षेत वारंवार गैरप्रकार होत असून पारदर्शकतेचा अभाव असल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

नीट घोटाळ्याशी संबंधित सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच वेळमर्यादेत चौकशी पूर्ण करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.

राजभवनावर मोर्चाचा प्रयत्न

आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी “नीट घोटाळ्यास केंद्र सरकार जबाबदार”, “मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा” अशा घोषणा देत फलक प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत काँग्रेसचा लढा सुरू राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

आंदोलनानंतर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजभवनाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना मार्गातच अडवले. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन सादर केले.

भाजपवर आरोपांची सरबत्ती

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस निगम भंडारी यांनी भाजप नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात तब्बल ८९ वेळा प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप केला. “विद्यार्थ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून, भाजपशासित राज्यांतच वारंवार पेपरफुटी होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

राज्य युवक काँग्रेस अध्यक्ष मंजुनाथ गौडा यांनी मोदी सरकारवर टीका करत, “इंडियन प्रीमियर लीगनंतर आता मोदी सरकारच्या काळात ‘इंडियन पेपर लीग’ सुरू झाली आहे,” असा टोला लगावला.

राजस्थानमधील शिक्षण मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा प्रश्नपत्रिका फुटीशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फ्रिडम पार्क परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनामुळे परिसरातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटकातील चारसह राज्यसभेच्या २४ जागांसाठी १८ जूनला निवडणुक

Spread the love  बंगळूर : भारतीय निवडणुक आयोगाने १० राज्यांतील २४ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *