बंगळूर : या महिन्याच्या २६ तारखेला राज्यातील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या १४ लोकसभा मतदारसंघांसाठीच्या जाहीर प्रचाराची काल सायंकाळी सांगता झाली.
मतदान संपण्याच्या ४८ तास जाहीर प्रचाराची मोहीम संपली, त्यानुसार आज संध्याकाळी १४ लोकसभा मतदारसंघातील खुल्या प्रचाराची सांगता झाली.
जाहीर प्रचाराचा समारोप लक्षात घेऊन मतदारसंघातील मतदार नसलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना निवडणूक आयोगाने मतदारसंघ सोडण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
१४ लोकसभा मतदारसंघातील एकही उमेदवार उद्या (ता.२५) पासून जाहीर प्रचार करू शकणार नाही. घरोघरी जाऊन मते मागण्याची संधी आहे. खुलेआम प्रचार केल्यास अशा उमेदवारांवर निवडणूक नियमानुसार कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या मतदारसंघात निवडणुका होणार आहेत, त्या मतदारसंघात मतदान नसलेले नेते व कार्यकर्ते राहू शकत नाहीत. अन्यथा त्यांच्यावर निवडणूक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
पहिल्या टप्प्यात राज्याच्या बंगळुर दक्षिण, बंगळुर उत्तर, बंगळुर ग्रामीण, बंगळुर मध्य, म्हैसूर-कोडगू, मंड्या, कोलार, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, उडुपी-चिक्कमंगळूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग आणि तुमकूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी (ता. २६) मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या १४ लोकसभा मतदारसंघांपैकी सर्व १४ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे, तर या निवडणुकीत भाजप-धजदने युती केली असून, भाजप-११ आणि धजदचे ३ उमेदवार रिंगणात आहेत.
राज्यात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रलंबित असलेल्या १४ लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी निवडणूक होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणूक होणाऱ्या १४ लोकसभा मतदारसंघांतील खुल्या प्रचारावर पडदा पडण्यापूर्वी भाजप-धजद आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांचा जोरात प्रचार केला.
पहिल्या टप्यात निवडणुक लढविणाऱ्या दिग्गज उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, म्हैसूरचे राजे यदूवीरदत्त वोडेयार, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे जावई आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश, माजी मंत्री व्ही. सोमण्णा, माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेस नेते राहूल गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मुख्यमंत्री सिध्दरामय्या, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आदीनी आपापल्या पक्षांच्या उमेदवांसाठी प्रचार मोहीम राबविली.