Sunday , September 8 2024
Breaking News

राज्यातील पहिल्या टप्प्यात आज मतदान

Spread the love

 

१४ मतदारसंघ; २,८८,३४२ जण बजावणार मतदानाचा हक्क

बंगळूर : राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांत उद्या (ता. २६) पहिल्या टप्यात मतदान होणार असून, निवडणूक आयोगाने शांततेत व मुक्त वातावरणात मतदान व्हावे यासाठी सर्व तयारी केली आहे.
उद्या होणाऱ्या मतदानात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, म्हैसूर राजघराण्याचे सदस्य यदुवीर दत्त वडेयार, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे भाऊ डी.के. सुरेश, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांच्यासह १४ मतदारसंघात २४७ उमेदवार असून, मतदार त्यांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. पहिल्या टप्यातील मतदानासाठी राज्यात एकूण ३०,४०२ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. दोन कोटी ८८ लाख ३४२ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. त्यापैकी १ कोटी ४४ लाख २८ हजार ०९९ पुरूष, १ कोटी ४३ लाख ८८ हजार १७६ महिला आणि ३०६७ तृतीयपंथीय मतदार आहेत, उद्या मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी केली असून सुमारे १ लाख ४० हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले आहे.
आज येथे निवडणुक
उडुपी-चिक्कमंगळूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बंगळुर ग्रामीण, बंगळुर उत्तर, बंगळुर मध्य, बंगळुर दक्षिण, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे.
सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार असून मतदारांना त्यांचे मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी निवडणूक ॲप डाउनलोड करता येणार आहे. या ॲपमध्ये मतदारांना त्यांचे मतदान केंद्र आणि त्यांची वाहने कोठे पार्क करायची, त्यांचे मतदार ओळखपत्र आदी माहिती मिळेल.
मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेसाठी सुमारे ५० हजार कर्मचारी आणि ६५ निमलष्करी पथके तैनात करण्यात आली आहेत. ज्या मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार आहे, त्यापैकी सुमारे १९,७०१ ठिकाणी वेबकास्टिंगची तयारी करण्यात आली आहे. १,३७० बूथवर मतदान केंद्र आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रासाठी अधिक पोलीस मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली असून कर्मचारी आज सायंकाळी मतदान केंद्रावर हजर झाले.
२४७ उमेदवार रिंगणात
पहिल्या टप्यातील १४ मतदारसंघातून २४७ उमेदवार रिंगणात राहिले असून त्यापैकी २२६ पुरुष आणि २१ महिला उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षाने सर्व १४ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत, तर भाजप-धजद युतीने भाजप ११ आणि धजद -३ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.
चिक्कबळ्ळापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे २९ उमेदवार रिंगणात आहेत, तर सर्वात कमी म्हणजे ९ उमेदवार दक्षिण कन्नड मतदारसंघात आहेत.
१४ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप-धजद युतीमध्ये थेट लढत आहे.
यांचे ठरणार राजकीय भवितव्य
माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, म्हैसूरचे वंशज यदुवीर दत्त वडेयार, तुमकूरचे माजी मंत्री व्ही. सोमण्णा, बंगळुर उत्तरमधून केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, बंगळुर ग्रामीण मतदारसंघातून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे भाऊ डी. के. सुरेश, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे जावई डॉ. मंजुनाथ, हसनमधून माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा, बंगळुर दक्षिण मतदारसंघातून परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांची कन्या सौम्या रेड्डी, तेजस्वी सूर्य, मुद्देहनुमगौडा, राजू गौडा, व्यंकटरामने गौडा, बी.एन. चंद्रप्पा, जयप्रकाश शेगडे, एम. लक्ष्मण, हमानुल्ला खान, गोविंद करजोळ यांच्यासह बंगळुर केंद्रातील पी. सी. मोहन, चिक्कबळ्ळापूर येथील माजी मंत्री डॉ. के. सुधाकर, काँग्रेसच्या रक्षा रामय्या आणि इतरांचे राजकीय भवितव्य अजमावणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

रेणुकास्वामी हत्या प्रकरण : अभिनेता दर्शन आणि इतराविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर

Spread the love  बी. दयानंद; ३,९९१ पानांचे आरोपपत्र बंगळूर : बंगळुर पोलिसांनी बुधवारी रेणुकास्वामी हत्याकांडातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *