सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : आंबोली परिसरामध्ये गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घाटामध्ये दरड कोसळली. तर आज सकाळी पूर्वीचा वस या ठिकाणी दरडीचा काही भाग रस्त्यावर आला. त्यामुळे तब्बल दहा तासाहून अधिक काळ घाट रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. सदरची दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
आंबोली परिसरामध्ये गुरुवारी दिवसभर तसेच रात्री असे चोवीस तासांमध्ये तब्बल 17 इंचापेक्षा जास्त पाऊस कोसळला याचा परिणाम म्हणून आंबोली घाट रस्त्यामध्ये धबधब्याच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर रात्री ठीक दोन वाजता दरडीचा भाग रस्त्यावर आला. यामध्ये मातीसह मोठे दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक खोळंबली तर शुक्रवारी सकाळी सात वाजता पूर्वीचा वस या ठिकाणी दरडीचा भाग रस्त्यावर आला. एकूणच या प्रकारामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
पावसाळ्यात होणाऱ्या आपत्कालीन घटना लक्षात घेता बांधकाम विभागाची यंत्रणा मात्र या परिस्थितीत या ठिकाणी हजर नसल्याचे दिसून आले. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती पहिली. दरड मोठी नसली तरी जेसीपी अभावी ते हटवणे कठीण आहे. मात्र सकाळी दरड हटवण्यासाठी आंबोली घाटात निघालेला जेसीपी माडखोल येथे तेरेखोल नदीला आलेला पुरामुळे अडकला आहे, त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत दरड हटविण्यात आली नव्हती.