Sunday , August 23 2026
Breaking News

मंथन कल्चरल वेल्फेअर सोसायटीच्या नूतन कार्यकारिणीची निवड

Spread the love

 

बेळगाव : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली चार दशके कार्यरत असलेल्या मंथन कल्चरल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव या नामांकित संस्थेच्या २०२६ ते २०२९ या कालावधीसाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी श्रीमती प्रिया कवठेकर, उपाध्यक्षपदी श्रीमती अस्मिता आळतेकर, सचिवपदी श्रीमती स्मिता किल्लेकर, सहसचिवपदी श्रीमती सिद्धी सुंठणकर, कोषाध्यक्षपदी श्रीमती पूजा इजारे तर सहकोषाध्यक्षपदी श्रीमती दीपा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

कला, साहित्य आणि संस्कृती यांची सुंदर सांगड घालत महिलांनी महिलांसाठी उभारलेले एक प्रेरणादायी व्यासपीठ म्हणजे मंथन कल्चरल वेल्फेअर सोसायटी. गेल्या ४० वर्षांपासून संस्था विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे.

संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध व्याख्याने, सामाजिक उपक्रम तसेच शारदोत्सवानिमित्त बौद्धिक, साहित्यिक आणि शारीरिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांमुळे महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्या वैचारिक आणि सांस्कृतिक जडणघडणीसही चालना मिळते.

यावेळी गेल्या तीन वर्षांत संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या माजी अध्यक्षा श्रीमती अपर्णा देशपांडे आणि त्यांच्या कार्यकारिणीच्या कार्याचे विशेष कौतुक करून त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका श्रीमती आशा कुलकर्णी, श्रीमती निर्मला कळीमनी आणि श्रीमती शोभा लोकुर यांचे मोलाचे मार्गदर्शन संस्थेला सातत्याने लाभत आहे. त्यांच्या अनुभवाच्या बळावर मंथन कल्चरल वेल्फेअर सोसायटीची यशस्वी वाटचाल भविष्यातही अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

प्राचार्य नाही, निर्णयांना विलंब! डाएटचे कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर

Spread the love  बेळगाव : जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *