बेळगाव : शिवम असोसिएट्सच्या कथित कोट्यवधी रुपयांच्या ठेवी फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि संस्थेचे मालक शिवानंद निलण्णावर यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन मिळाला असला तरी प्रकरणातील तपास अद्याप सुरू असून त्यांच्यावरील कायदेशीर अडचणी कायम आहेत.
या प्रकरणात शिवानंद निलण्णावर यांनी बेकायदेशीरपणे ठेवी गोळा केल्याचा आरोप असून, सीआयडीच्या तपासादरम्यान यासंदर्भातील अनेक बाबी उघड झाल्याचे सांगितले जात आहे. ठेवीदारांची फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (केपीआयडी) कायद्यांतर्गत या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित यंत्रणा निलण्णावर यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
न्यायालयाने निलण्णावर यांना नियमित जामीन न देता काही अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. तपासात पूर्ण सहकार्य करणे, चौकशीसाठी हजर राहणे आणि न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन करणे त्यांच्यासाठी बंधनकारक असणार आहे.
तपासात सहकार्य करण्यात कसूर केल्यास किंवा अटींचे उल्लंघन झाल्यास त्यांना पुन्हा कारावासाला सामोरे जावे लागू शकते, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जामीन मिळाला असला तरी शिवानंद निलण्णावर यांच्यावरील कायदेशीर संकट अद्याप टळलेले नाही.
दरम्यान, फसवणूक प्रकरणातील आर्थिक व्यवहार, ठेवीदारांचे नुकसान आणि निधीचा वापर याबाबत सीआयडीकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta