

हजारो कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणाचा तपास वेगात
बेळगाव : आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. बलराज माने यांना बेंगळुरू येथील शहर व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने २२ जून रोजी हा आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
आदित्यराज कॅपिटलशी संबंधित कथित आर्थिक फसवणूक प्रकरणामुळे हजारो गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली असून, या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. अधिक परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक गोळा केल्याचा आरोप कंपनीवर करण्यात आला आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची जबाबदारी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आली आहे. कथित आर्थिक व्यवहारांची व्याप्ती, गुंतवणूकदारांची मोठी संख्या आणि फसवणुकीच्या आरोपांचे स्वरूप लक्षात घेता सीआयडीकडून सखोल चौकशी सुरू आहे.
दरम्यान, सीआयडीचे उपअधीक्षक (डीवायएसपी) रवी एच. यांनी अलीकडेच बेळगावातील टिळकवाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाच्या प्रगतीचा आढावा घेतला. विविध कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची माहिती तपासली जात असल्याचे समजते.
डॉ. बलराज माने यांना अटकपूर्व जामीन मिळाला असला तरी प्रकरणाचा तपास सुरूच राहणार असून, फसवणुकीच्या आरोपांबाबत सीआयडीकडून पुढील चौकशी आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाकडे गुंतवणूकदारांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Belgaum Varta Belgaum Varta