Monday , August 17 2026
Breaking News

चापगाव जल जीवन मिशन कामांबाबत ग्रामस्थांचा आक्षेप; चौकशीची मागणी

Spread the love

 

खानापूर : चापगाव ग्रामपंचायत हद्दीतील जल जीवन मिशन (JJM) अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये अनेक त्रुटी आणि अपूर्णता असल्याचा आरोप करत माजी पंचायत अध्यक्ष रमेश मल्हारी धबाले व ग्रामस्थांनी तालुका पंचायतच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या या योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असला, तरी अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला कोणतेही पूर्णता प्रमाणपत्र, अंतिम मंजुरी किंवा ना हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करून कामांची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी मंजूर अंदाजपत्रकानुसार सर्व कामे पूर्ण झाली आहेत का, वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा योग्य आहे का, तसेच कामाची गुणवत्ता आणि तांत्रिक निकषांचे पालन झाले आहे का, याची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय पाणीपुरवठा योजनेची कार्यक्षमता, नियमितता, पाण्याची उपलब्धता आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोच यांचेही मूल्यमापन करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात चापगाव येथे ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांचे अभिप्राय, तक्रारी आणि सूचना जाणून घ्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या अनुभवांच्या आधारे योजनेचे मूल्यांकन करण्यात यावे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी पाच प्रमुख अटी मांडल्या असून, त्यामध्ये मंजूर अंदाजपत्रकानुसार सर्व कामांची पडताळणी, तांत्रिक तपासणी, पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन, ग्रामसभेचे आयोजन आणि आढळलेल्या सर्व त्रुटी दूर करणे यांचा समावेश आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीने योजनेचा ताबा घेऊ नये तसेच कंत्राटदाराला कोणतीही अंतिम मंजुरी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास किंवा समाधानकारक कारवाई न झाल्यास तालुका पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी आणि अशा कंत्राटदारांना पाठबळ देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धबाले, एसडीएमसी अध्यक्ष मशनू चोपडे, यल्लाप्पा कदम, लक्ष्मण पाटील, गणेश कदम, बळवंत पाटील, यल्लाप्पा पाटील, जग्गू पाटील, सुनील धबाले, यल्लाप्पा धबाले, मशनु सुतार, लक्ष्मण मादार, अर्जुन मादार, विठ्ठल सुतार, हनुमंत पाटील, तम्मा मारीहाळ, संजू मादार, बाळू गुरव, निंगाप्पा गुरव आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

Spread the love  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *