Wednesday , August 19 2026
Breaking News

उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिनानिमित्त रविवारी (दि. २८) जिल्हाभरात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व पात्र बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार असून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. आय. बी. गडद यांनी केले आहे.

रविवारी जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर पोलिओ लस उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस आरोग्य विभागाची पथके घरोघरी भेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे डोस देणार आहेत.

भारताने पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळविल्यानंतरही हा दर्जा कायम राखण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दरवर्षी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाते. यंदा जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील ४ लाख ७ हजार ४१ बालकांना पोलिओ लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात २,३३१ लसीकरण केंद्रे, ३९ फिरती पथके, ९,५१४ आरोग्य कर्मचारी आणि ६१८ निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. शासकीय व खासगी रुग्णालये, अंगणवाडी केंद्रे, वीटभट्ट्या, कामगार वसाहती, झोपडपट्ट्या, पुनर्वसन केंद्रे, शेतीवाडीतील घरे, दुर्गम वाड्या, तसेच रेल्वे स्थानके, विमानतळ आदी ठिकाणी विशेष लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, या मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील विविध सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांनी जागृती फेऱ्या काढून नागरिकांना पोलिओ लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. सर्व पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून राष्ट्रीय मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गुड्स शेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

Spread the love  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *