Monday , August 17 2026
Breaking News

सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव सीमाभागातील खानापूर, बेळगाव तसेच इतर भागांतून नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने पुणे येथे स्थायिक झालेल्या मराठी युवकांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागात घरोघरी जाऊन सीमाप्रश्नाबाबत जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई दौरा पूर्ण केल्यानंतर पुणे विभाग समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संयुक्त बैठक आयोजित केली. या बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेले भाषिक अन्याय, प्रशासकीय दडपशाही, पोलीस यंत्रणेकडून होणारे कथित अत्याचार तसेच सीमाप्रश्नाच्या न्याय्य सोडवणुकीसाठी महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्त्यांनी कोणते उपक्रम राबवावेत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले की, सीमाभागातील युवकांनी या ऐतिहासिक संघर्षात नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवला आहे आणि आजही युवकच या लढ्याच्या अग्रभागी उभे आहेत. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा लढा सातत्याने चालू ठेवू आणि मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करू, असे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या तीन-चार महिन्यांपासून पुणे विभागातील युवा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक करून भविष्यातही असेच सहकार्य कायम ठेवण्याचे आवाहन केले.

पुणेस्थित उद्योजक गणपती पाटील यांनी सांगितले की, पुणे विभाग समितीच्या माध्यमातून खानापूर, बेळगाव व सीमाभागातून पुण्यात स्थायिक झालेल्या नागरिकांमध्ये घरोघरी जाऊन सीमाप्रश्नाची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची समितीची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बैठकीस पुणे विभाग समितीचे विश्वनाथ पाखरे, सातेरी पाटील, वैराळ सुळकर, मारुती पाटील, अर्जुन वीर, गंगाराम वीर, अमोल पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या संध्या किरण सेवा केंद्रात देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्राच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *