Monday , August 17 2026
Breaking News

एसकेई सोसायटीचा संस्थापक दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटी, बेळगावचा संस्थापक दिन आरपीडी महाविद्यालयातील के. एम. गिरी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात कु. वृंदा मंजरी यांच्या मंगलमय स्वागतगीताने झाली. आरपीडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व निमंत्रितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सोसायटीच्या सचिव लता कित्तूर यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास आणि शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला.

प्रमुख पाहुणे श्रीमंत खेमराज सावंत भोसले यांनी राजमाता राणी पार्वतीदेवी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या शिक्षणविषयक व समाजहिताच्या कार्याची माहिती दिली. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या इतिहास विभागाचे प्रमुख, इतिहास संशोधक व अभ्यासक डॉ. अवनीश पाटील यांनी ‘शिक्षणाचा उद्देश’ या विषयावर मार्गदर्शन केले.

शिक्षण हे मातृभाषा आणि भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित असावे. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्ये रुजविणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले, महादेव गोविंद रानडे, महर्षी कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांचा संदर्भ देत त्यांनी शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे स्पष्ट केले. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी मूल्याधिष्ठित शिक्षण रुजविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणातून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले. संस्था ही सामाजिक चळवळीचे केंद्र बनून समाज व राष्ट्रहिताची जाणीव असणारे नागरिक घडविण्याचे कार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मंडळ, प्राध्यापक, विद्यार्थी आणि निमंत्रित उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शर्मिला संभाजी व प्रा. रिता व्ही. बनगर यांनी केले. प्रा. श्रुती साळगुडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व विश्वभारत सेवा समितीचे दुसरे बालकवी संमेलन 18 ऑगस्टला

Spread the love  बेळगांव : तारांगण व विश्वभारत सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने दुसरे बालकवी संमेलन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *