
‘सखी’च्या ‘चला खेळूया मंगळागौर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५ हून अधिक स्टॉल्स ठरले आकर्षणाचे केंद्र
बेळगाव : पारंपरिक संस्कृतीचा जागर, महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ आणि महिला उद्योजिकांना व्यवसायाची नवी संधी… अशा त्रिवेणी संगमातून ‘सखी’तर्फे आयोजित ‘चला खेळूया मंगळागौर २०२६’ या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. गुजरात भवन, शास्त्रीनगर येथे रंगलेल्या या सोहळ्याने महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांसोबतच विविध आकर्षक स्टॉल्सची रेलचेल हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “महिलांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांना आपली कला, कौशल्य आणि उद्योजकता सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा ‘सखी’चा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांमधील पारंपरिक कला, संस्कृती आणि उद्योजकतेला निश्चितच चालना मिळेल.”

महिलांनी केवळ घराच्या चौकटीत न राहता आपल्या कौशल्याला व्यवसायाची जोड देत स्वावलंबी होण्याची गरज आहे. ‘चला खेळूया मंगळागौर’सारखे उपक्रम त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वासही डॉ. सरनोबत यांनी व्यक्त केला.
दीपप्रज्वलनाने सोहळ्याला सुरुवात
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सोनाली सरनोबत, ‘सखी’च्या संस्थापिका-अध्यक्षा रश्मी चिकोर्डे आणि उपाध्यक्षा एकता गोंदकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री गणेशपूजन करण्यात आले. यावेळी कमिटी मेंबर अर्चना हावळ, पल्लवी उरणकर, वीणा हावळ, मंजुश्री काकडे, नम्रता काकतकर, ज्योती दीक्षित, वर्षा रेवणकर यांच्यासह सखीच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
खरेदीची रंगत; ३५ हून अधिक स्टॉल्स
सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच महिलांसाठी खरेदीचीही विशेष मेजवानी या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३५ हून अधिक वैविध्यपूर्ण स्टॉल्स येथे उभारण्यात आले असून विविध वस्तूंची खरेदी करण्याची संधी महिलांना मिळाली आहे.
ज्वेलरी, खाद्यपदार्थ, आकर्षक वस्त्रे, ब्युटी प्रॉडक्ट्स, बॅग्ज, सुगंधित पानमसाला, कापडी तोरणे यासह विविध आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे एकीकडे मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचा उत्साह, तर दुसरीकडे खरेदीची रंगत, अशा दुहेरी आनंदात महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
परंपरा आणि उद्योजकतेचा सुंदर मिलाफ
‘चला खेळूया मंगळागौर २०२६’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता महिलांच्या पारंपरिक संस्कृतीला नवसंजीवनी देतानाच त्यांच्या उद्योजकतेला बळ देणारे व्यासपीठ ठरत आहे. मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांमधून संस्कृतीचा जागर होत असतानाच स्टॉल्सच्या माध्यमातून महिला उद्योजिकांच्या कर्तृत्वाला बाजारपेठ मिळत आहे. त्यामुळे या महोत्सवाने ‘परंपरा जपूया आणि स्वावलंबनाची वाट धरूया’ असा सकारात्मक संदेश दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta