


परप्पन अग्रहार कारागृहात मोबाईल व सिमकार्ड सापडल्याचे प्रकरण; कारागृहाच्या डीजीपींकडून स्थलांतराचे आदेश
बेळगाव : माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांची बंगळुरूमधील परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृहातून बेळगावातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारागृहात मोबाईल फोन आणि सिमकार्ड आढळल्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
कारागृहाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आलोक कुमार यांच्या आदेशानुसार प्रज्वल रेवण्णा यांना बेळगावला हलविण्यात येणार आहे. त्यांना शुक्रवारी सायंकाळी किंवा रात्री हिंडलगा कारागृहात आणले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अलीकडेच परप्पन अग्रहार कारागृहातील प्रज्वल रेवण्णा यांच्या कोठडीत मोबाईल फोन आणि सिमकार्ड आढळले होते. याप्रकरणी परप्पन अग्रहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती.
कारागृहात मोबाईलचा वापर केल्याच्या आरोपाशी संबंधित या प्रकरणानंतर त्यांची हिंडलगा कारागृहात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या स्थलांतराबाबतची पुढील कार्यवाही सुरू असल्याचे वृत्त आहे.

Belgaum Varta Belgaum Varta