खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी
खानापूर : पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नंदगड (ता. खानापूर) येथील तलावाची युद्धपातळीवर डागडुजी केली जावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन आज सकाळी खानापूर तालुक्याच्या लघु पाटबंधारे विभागाचे खानापूर सेक्शन अधिकारी कोमन्नवर यांना सादर करण्यात आले. त्यांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरेने योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. खानापूर तालुक्यातील नंदगड येथील तलाव लघु पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत येतो. या तलावाला तडे गेल्याचे वृत्त नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून खानापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे नंदगड येथील तडे गेलेला तलाव धोकादायक ठरू शकतो. सदर तलावाच्या दुरुस्तीसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. तेंव्हा त्याची लवकरात लवकर पूर्तता करून तलावाची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना धनंजय पाटील, सदानंद पाटील, दामोदर नाकाडी, किशोर हेब्बाळकर, मोनाप्पा संताजी, सुधाकर देसाई, विशाल बुवाजी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.