खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
खानापूर : कळसा- भांडुरा प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर म. ए. समितीची बैठक बोलाविण्यात आली होती.
या बैठकीला कळसा- भांडुरा प्रकल्पाचे गाढे अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर हे उपस्थित होते. प्रा. केरकर यांनी म्हादई प्रकल्पाची माहिती समिती कार्यकर्त्यांना दिली.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज सोमवार दि. 2 जानेवारी रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश चव्हाण हे होते.
म्हादई प्रकल्पामुळे नदीकाठची अनेक गावे पाण्याखाली जाणार आहेत. तालुक्यातील हजारो लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कळसा- भांडुरा प्रकल्पाचे 3.5 टीएमसी पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावात पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे याबद्दलचे मत जाणून घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविण्याचा निर्णय म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मराठी माणसांच्या मतावर सत्तेत आलेल्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात येणार आहे.
त्याचबरोबर सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष अनुदान मंजूर केले आहे. खानापूर तालुक्यात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील बहुतांश गावात संत परंपरेने पांडुरंग सप्ताह व ज्ञानेश्वर पारायणे केली जातात या परायणाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जपण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करत असतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून तालुक्यातील या पारायण मंडळांना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक अनुदान मिळवून देण्यासाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
यावेळी समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.