खानापूर : सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन मराठा समाजाचा खासदार दिल्लीत पाठवा. मागील 30 वर्षे भाजप खासदारांनी फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठीच खानापूर तालुक्याचे दौरे केले आहेत आणि खानापूर तालुक्याच्या विकासाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीकडे मोदींच्या नावाने मते मागण्यावाचून पर्याय राहिला नाही. विकासाभिमुख असे कोणतेच उत्तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे नाही. त्यासाठीच खानापूरसारख्या दुर्गम भागातील उच्च शिक्षित डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना काँग्रेस पक्षाने कारवार लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे तालुक्यातील मराठा समाजाने राजकारण बाजूला सारत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन यशवंत बिर्जे यांनी केले.
बैलूर येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस सरकारने कर्नाटकात योजना लागू केल्या आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली आहे. काँग्रेस पक्षाने खानापूर तालुक्याला दिलेली लोकसभेची उमेदवारी ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. काँग्रेसने कर्नाटकात दिलेली आश्वासने तात्काळ अमलात आणली आहेत. काँग्रेस पक्ष फक्त आश्वासन देत नाही तर दिलेला शब्द देखील पाळतो हे कर्नाटकातील पाच गॅरंटी योजनांच्या रूपात दाखवून दिले आहे. केंद्रात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास प्रति महिना आठ हजार रुपये आर्थिक सहाय्य निधी देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे त्यासह कर्जमाफीसह अनेक योजना सुरू करण्याची आम्ही दीदी आहे. जेणेकरून देशातील प्रत्येक नागरिकांना आपले कुटुंब चालविणे सोयीस्कर होईल त्यामुळे येत्या लोकसभेत कारवार मतदार संघातून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना भरघोस मतांनी दिल्ली दरबारी पाठवू.
यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.