बेळगाव : गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद असलेल्या चन्नेवाडी ता.खानापूर येथील शाळा सुरू करण्याच्या पालकांच्या व गावकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश येतांना दिसून येत आहे, आज गावकरी मंडळी व पालकांनी खानापूर गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले.
शाळा तात्कालीन शिक्षकांच्या सोयीस्कर वागण्यामुळे कशी बंद पडली व त्यानंतर गावातील विद्यार्थ्याची शाळेअभावी कशी गैरसोय झाली याची संपूर्ण माहिती राजश्री कुडची यांना देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपूर्वी खानापूरचे आमदार श्री. विठ्ठल हलगेकर यांनीही शाळेला भेट देऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. पुन्हा गावकऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करत गट शिक्षणाधिकारी यांना गावकऱ्यांच्या व पालकांच्या सह्यांचे निवेदन देऊन आमदारांशी संपर्क साधला. या मागणीला व पाठपुराव्याला यश येताना दिसत असून आजच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ व सद्य परिस्थितीत प्रति शिक्षाकाची नियुक्ती करण्या संदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून तात्काळ कार्यवाही करू असे आश्वासन गट शिक्षणाधिकारी व आमदारांनी दिले.
यावेळी विठ्ठल पाटील, मुरलीधर पाटील, धनंजय पाटील, सुधाकर पाटील, शंकर पाटील, दत्ताराम पाटील, उदय पाटील आदी ग्रामस्थ व पालक हजर होते.