मणतुर्गे येथे माहेरवाशीनींचा सत्कार सोहळा
खानापूर : मणतुर्गे येथे श्री पांडुरंग सप्ताह उत्सवानिमित्त श्री रवळनाथ मंदिर कमिटीतर्फे दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता मणतुर्गे येथे माहेरवाशीनींचा सत्कार सोहळा मानाचा फेटा व वाण देऊन मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अंकिता राजाराम पाटील या होत्या. स्वागताध्यक्ष सौ. चित्र प्रशांत पाटील या होत्या. कार्यक्रमची सुरुवात गणेश पूजनाने करण्यात आली. स्वागताध्यक्ष सौ. चित्र पाटील यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले तर सौ. लक्ष्मी सातेरी गुरव यांच्या हस्ते रवळनाथ पूजन करण्यात आले. स्नेहल सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर कलावती माता पूजन सौ. ऋतुजा राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कासवपूजन सौ. वैभवी विनोद देसाई यांच्या हस्ते करण्यात आले तर दीप प्रज्वलन लक्ष्मी विष्णु गुरव माजी उपाध्यक्ष ग्रामपंचायत मणतुर्गे, सौ. शारदा संजय दौलतकर संचालिका पिकेपीएस खानापूर, सौ. सुमित्रा वसंत देसाई सौ.अंकिता अनिल देवकरी, विजयालक्ष्मी विक्रम पाटील, सौ. सुप्रिया ज्ञानेश्वर गुंडपीकर, सौ. भाग्यश्री भाऊराव देसाई, सौ. प्रभावती बळीराम गुंडपीकर, सौ.प्रभावती पांडुरंग पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून सौ. सुषमा चंद्रकांत शेलार उपस्थित होत्या.
सुषमा शेलार बोलताना म्हणाल्या की, मणतुर्गे गावकऱ्यांनी गावातील सूना व माहेरवाशीनींचा सन्मान करून रवळनाथ मंदिर तालुक्यात एक नवा आदर्श घालून दिला आहे. नुकताच गावातील महिलांचा हळदीकुंकू समारंभ आयोजित करून गावातील महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्याबद्दल नियोजकांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करते यापूर्वी महिला चूल आणि मुल एवढ्यातच मर्यादित होत्या परंतु बदलत्या जगात मणतुर्गे गावातील महिला देखील आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. प्राथमिक शिक्षिका, पदवीधर, उच्च पदवीधर, वकील, विविध संघ संस्थांमध्ये विविध पदावर आज आमच्या गावातील महिला कार्यरत आहेत. महिलांनी आई-वडील, सासू-सासरे यांच्या योगदानातून आपण या पदावर उभे आहोत यातून ऋणमुक्त होण्यासाठी हिंदू पद्धतीप्रमाणे भारतीय संस्कृती जपून आपल्या सुखी संसारात आपल्या कुटुंबाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आपल्या जोडीदाराला साथ द्यावी व आपलं कुटुंब, आपले शेजारी, आपलं गाव, आपला देश प्रगतीपथावर आणण्यासाठी शिक्षणाकडे आवर्जून लक्ष द्यावे व आपल्या पालकांचे नाव कीर्तिमान करावे असे विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले. तसेच अंकिता चंद्रकांत देवकरी अतिथी शिक्षिका यांनी देखील आपले विचार मांडले. कार्यक्रमात गावातील तीनशे माहेरवाशींनी सहभाग घेतला होता. श्री रवळनाथ जीर्णोद्धार मंदिरासाठी व गावातील महिलांकडून तीन लाख 51 हजार रुपयांची भरघोस देणगी देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री रवळनाथ मंदिर जिर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष श्री. आबासाहेब नारायणराव दळवी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रल्हाद मादार यांनी केले. त्यानंतर रात्री मणतुर्गे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. शालेय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीर्णोद्धार कमिटी सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शांताबाई शांताराम पाटील यांनी केले.