खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा शाळा स्थापन करण्याच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे तो शिक्षित झाला पाहिजे आणि त्यासाठी त्याला जे जे काही हवे असेल ते प्राप्त करून देण्यासाठी या समाजातील सेवाभावी संस्था नेहमी तत्पर असतात आणि त्यानी आपल्या या संस्थेतील शाळेसाठी जे कार्य केले आहे त्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने त्यांचे ऋणी आहोत, असे उद्गार दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी प्राध्यापक विक्रम पाटील यांनी काढले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे नूतन शैक्षणिक कक्ष, क्रीडा भवन आणि स्वच्छतागृह उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे चेअरमन श्री. तुकाराम हनमंतराव साबळे होते. व्यासपीठावर डॉ. सुरेश कुलकर्णी नेत्रतज्ञ बेळगाव, अरविंद खडबडी, शशिकांत नाईक होते. शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून शांती फोमॅक प्रा. लि. बेळगावचे व्हाईस प्रेसिडेंट शांतीलाल पोरवाल यांच्या सौजन्यातून शाळेचा नूतन शैक्षणिक कक्ष उभारण्यात आला आहे, ए.के.पी फाउंड्रीज प्रा.लि बेळगावचे सर्वेसर्वा श्री. राम भंडारी यांच्या सौजन्यातून भव्य अशा जिमखानाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच श्री. माध्वा नरसिंह आचार्य संस्थापक अभिषेक अलॉइज प्रा. लि. बेळगाव यांच्या सौजन्याने शाळेला फर्निचरची व्यवस्था, तसेच बेम्को चे मॅनेजर श्री. अरविंद पालकर यांच्या सौजन्यातून शाळेला संगणक प्राप्त झालेले आहेत. या सर्व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून हा सर्व कायापालट हायस्कूलच्या वाटचालीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या सर्वांसाठी प्रा. के व्ही. पाटील सर आणि त्यांच्या युनिटी फॉर व्हिजन ग्रुपने विशेष प्रयत्न केले आहेत. यावेळी सर्व देणगीदारांचे हायस्कूलच्या व संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावरती मार्गदर्शक म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील, सेक्रेटरी प्रा. विक्रम पाटील व संचालक श्री पी.पी. बेळगावकर, आकांक्षा सर्जिकलचे श्री. राजू पाटील, रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामचे माजी अध्यक्ष श्री. डी. बी. पाटील व प्रमुख वक्ते श्री. एस. डी. पाटील उपस्थित होते.
यावेळी दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. शाळेचा विद्यार्थी समर्थ सातेरी देसाई जांबोटी केंद्रात प्रथम व तालुक्यात द्वितीय तसेच साक्षी पांडुरंग चव्हाण हिने केंद्रात तृतीय आणि तालुक्यात पाचवा क्रमांक व वैष्णवी देवळी हिने तालुक्यात आठवी आल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने केली तसेच दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना विविध मान्यवरानी आपल्या मनोगतातून शाळेच्या परिवर्तनाबद्दल कौतुक आणि शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी श्री. शांतीलाल पोरवाल, श्री. राम भंडारी श्री. आचार्या, श्री. सुरेश कुलकर्णी, श्री. के. वी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त व्यक्त केले. प्रमुख वक्ते म्हणून एस. डी. पाटील सरांनी सुद्धा शाळेतील परिवर्तनाचे कौतुक करत सर्व दानशूर देणगीदारांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मुख्याध्यापक सी. एस. कदम यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत करून शाळेच्या विकासाचा आढावा घेत सर्वांना धन्यवाद दिले.
माजी विद्यार्थी, हितचिंतक, शुभचिंतक, गावकरी, विद्यार्थी, शाळा सुधारणा समिती प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन सहशिक्षक ए. जे. सावंत व आभार सहशिक्षक एस. आय. काकतकर यांनी मानले.