Friday , April 17 2026
Breaking News

परीक्षेच्या रणांगणावर उतरण्यापूर्वीचा आत्मविश्वासाचा संवाद पालक जागर सभेतून प्रकट!

Spread the love

 

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथे प्रेरणादायी पालक मेळावा

खानापूर : वार्षिक परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना विद्यार्थिनींच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता, भीती व ताण दूर करून आत्मविश्वास जागवणे, अभ्यासाला योग्य दिशा देणे तसेच पालक शिक्षक विद्यार्थिनी यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणे या उद्देशाने म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथे अत्यंत महत्त्वाचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला. हा मेळावा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता विद्यार्थिनींच्या शैक्षणिक यशासाठी एक निर्णायक टप्पा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीत व ईशस्तवनाने झाली. त्यानंतर प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सुनिता कणबरकर यांनी प्रभावी शब्दांत पालक मेळाव्याची भूमिका मांडत, हा मेळावा विद्यार्थिनींच्या भविष्याशी थेट संवाद साधण्याची संधी असल्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थिनींच्या अभ्यासातील अडचणी, परीक्षेपूर्व मानसिकता तसेच घरी पालकांनी कसे पोषक व सकारात्मक वातावरण निर्माण करावे याबाबत प्रा. जयश्री शिवठणकर यांनी अत्यंत वास्तववादी व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अभ्यासातील सातत्य, नियमित सराव आणि पालक… मुली यांच्यातील सकारात्मक संवाद यावर त्यांनी विशेष भर दिला.
यानंतर पहिल्या पूर्व-प्रिपरेटरी परीक्षेचा निकाल प्रा. श्री. पुंडलिक कर्लेकर यांनी वाचून दाखवला. या निकालाच्या माध्यमातून पालकांना आपल्या पाल्याची सद्यस्थिती, तिची ताकद तसेच सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे स्पष्टपणे समजली.
विद्यार्थिनींचे मनोगत कुमारी समिक्षा झुजवाडकर हिने मांडताना विद्यार्थिनींच्या भावना, अपेक्षा व संघर्ष प्रामाणिकपणे व्यक्त केले. पालक प्रतिनिधी व व्यावसायिक श्रीयुत कदम यांनी पालकांच्या जबाबदारीवर आणि या काळात मुलींना भावनिक आधार देण्याच्या गरजेवर मार्मिक विचार मांडले.
आई-पालक सौ. गायत्री देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन पार पडले. कार्यक्रमास व्यासपीठावर ज्येष्ठ प्रा. श्री नरसिंह पाटील, पालक तानाजी पाटील यांची उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय समारोप प्राचार्य अरविंद पाटील यांनी केला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, परीक्षा ही केवळ गुणांची नसून संयम, सातत्य आणि आत्मविश्वासाची कसोटी असते. पालकांनी या निर्णायक काळात मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, तर यश निश्चितपणे प्राप्त होते. मोबाईलच्या अतिरेकापासून दूर राहणे, वेळेचे काटेकोर नियोजन करणे आणि शांत वातावरणात अधिक सराव करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यानंतर उपस्थित पालक व विद्यार्थिनींना पहिल्या पूर्व वार्षिक परीक्षेच्या मूल्यमापन केलेल्या उत्तर पत्रिका दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन प्रा. मंगल देसाई–पाटील यांनी भावपूर्ण शब्दांत केली.
एकूणच हा पालक मेळावा विद्यार्थिनींच्या मनात आत्मविश्वास जागवणारा, पालकांना जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि परीक्षेसाठी मानसिकदृष्ट्या सज्ज करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

About Belgaum Varta

Check Also

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *