Friday , April 17 2026
Breaking News

पंचहमी योजनांतर्गत खानापूर तालुक्यात ५०० कोटींचा लाभ : डॉ. अंजलीताई निंबाळकर

Spread the love

 

खानापूर : राज्य सरकारच्या पंचहमी योजनांमुळे खानापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेपर्यंत आत्तापर्यंत साधारणपणे ५०० कोटी रुपये पोहोचल्याची माहिती आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी दिली. काँग्रेस सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांच्या उन्नतीसाठी पंचहमी योजना प्रभावीपणे राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यभरात सुमारे १००० दिवसांत पंचहमी योजनांसाठी १.१६ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ही देशातील सर्वात मोठ्या कल्याणकारी योजनांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील सुमारे १.३७ कोटी कुटुंबांना या योजनांचा थेट लाभ होत आहे. तसेच पंचहमी योजनांमुळे राज्याच्या दरडोई उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला.

खानापूर तालुक्यात दरमहा सुमारे २० कोटी रुपये पंचहमी योजनांमधून येत असून, योजना सुरू होऊन सुमारे २६ ते २७ महिने पूर्ण झाले आहेत. त्या प्रमाणे आतापर्यंत जवळपास ५०० कोटी रुपये तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचले आहेत. सरकार पैसे देत नाही, हा विरोधकांचा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्याला मिळालेला हा निधी जनतेच्या खात्यात थेट जमा झाला असून, याशिवाय विकासकामांसाठी मिळणारा निधी वेगळा असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक सरकारची ध्येयधोरणे वेगळी असतात. काँग्रेसचे धोरण हे गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांच्या सबलीकरणावर आधारित आहे, त्यामुळे या घटकांसाठी भरीव निधी दिला जात आहे. याउलट केंद्रातील मोदी सरकारचे धोरण उद्योगपतींना धार्जिणे असून, उद्योगपतींच्या कर्जमाफीकडे झुकते, अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेस म्हणजे सामान्य जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारे आणि सामान्यांना मदत करणारे सरकार आहे, हे कायम लक्षात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *