
खानापूर : खानापूर तालुक्यातच नव्हे तर बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटक राज्यात आपल्या अव्वल गुणवत्तेने ठसा उमटवणाऱ्या म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कु. सबीना लुईस लोबो हिच्या यशाचा गौरव करण्यासाठी मलेशिया स्थित ॲटलांटा कार समूहाचे निष्णात डायरेक्टर श्री. परशराम कोलेकर यांनी रोख रुपये अकरा हजारांचा धनादेश सुपूर्द करून तिच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा केला.
कु. सबीना लुईस ही अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे आलेली विद्यार्थिनी. आई-वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढतात, वडील गवंडी कामगार; मात्र या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सबीनाने जिद्द, चिकाटी आणि प्रचंड परिश्रम यांच्या जोरावर 600 पैकी तब्बल 590 गुण संपादन करून खानापूर तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी शिकवणीचा आधार न घेता केवळ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून तिने हे दैदिप्यमान यश मिळवले.
तिच्या या यशाने परिस्थितीला दोष देणाऱ्यांना आणि प्रयत्नांपासून दूर पळणाऱ्यांना जणू झणझणीत अंजन घातले आहे. अशा जिद्दी आणि गुणवंत विद्यार्थिनीची दखल घेत, नेहमी पडद्याआड राहून गरजू विद्यार्थ्यांना मदत करणारे श्री. परशराम कोलेकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांच्याशी संपर्क साधून सबीनाच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला.
सदर धनादेश कु. सबीना हिच्या घरी जाऊन तिला प्रत्यक्ष बहाल करण्यात आला, ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. या प्रसंगी प्रा. श्री. पी. व्ही. कर्लेकर, प्रा. श्री. टी. आर. जाधव, प्रा. श्री. एन. ए. पाटील, प्रा. नितीन देसाई, प्रा. श्रीमती सी. एस. कणबरकर, प्रा. श्रीमती वनिता गावडे, प्रा. श्रीमती जे. एफ. शिवठणकर, प्रा. श्रीमती एम. वाय. देसाई तसेच हरसनवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु. सबीना लुईस लोबो हिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण खानापूर तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत असून, “जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतीही परिस्थिती अडथळा ठरत नाही,” हा संदेश तिच्या कर्तृत्वातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta