
“चंदनापरी देह झिजविला, कष्टातून संसार फुलविला…
शून्यातून विश्व उभे केले, पण स्वतःसाठी जगणे मात्र विसरलात…”
दिनांक ४ जुलै २०२५ रोजी आम्हा सर्वांना कायमचे पोरके करून जाणारे माझे थोरले बंधू कै. पांडुरंग शांताराम हेब्बाळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
पांडुरंग यांचा जन्म १० मार्च १९७० रोजी तिवोली येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावात, तर माध्यमिक शिक्षण गुंजी येथे पूर्ण झाले. वडील प्रगतशील शेतकरी, गावचे पंच आणि दुग्धव्यवसायिक असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे संस्कार झाले. मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे, ही वडिलांची इच्छा त्यांनी सार्थ ठरवली. पदवीचे शिक्षण त्यांनी गोगटे महाविद्यालय, बेळगाव येथे पूर्ण केले.
शिक्षणानंतर त्यांनी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीच्या माध्यमातून महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातही कार्य केले. त्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे परतले आणि वडिलांचा दुग्धव्यवसाय सांभाळत ग्रामीण जनतेशी घट्ट नाते निर्माण केले. गुंजी परिसरात ते प्रेमाने “पांडू गवळी” म्हणून ओळखले जात.
सन २००३ मध्ये त्यांनी एलआयसीचे विमा प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले. आपल्या प्रामाणिक स्वभावामुळे आणि लोकांशी जिव्हाळ्याने वागण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी ग्राहकांचा अपार विश्वास संपादन केला. २००६ पासून सलग शतकवीर विमा प्रतिनिधी म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, तसेच तीन वेळा एम.डी.आर.टी. (MDRT) प्रतिनिधी होण्याचा मान मिळवला. आजच्या स्पर्धात्मक काळात ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख मात्र त्यांच्या माणुसकीत होती. प्रत्येकाशी प्रेमाने बोलणे, संकटात धावून जाणे, कोणालाही न दुखावणे आणि समाजात सन्मानाने वागणे, हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. २००७ साली तिवोली ग्रामदैवत श्री लक्ष्मी यात्रोत्सव समितीचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
कुटुंबावर त्यांचे अपार प्रेम होते. आई-वडील, भाऊ, नातेवाईक आणि समाज यांच्यासाठी ते कायम धावून जात राहिले. मुलांना उच्च शिक्षण दिले, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट केले; मात्र त्यांच्या यशाचा आनंद मनसोक्त उपभोगण्यापूर्वीच नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.
आज त्यांच्या जाण्याला एक वर्ष पूर्ण झाले, तरी त्यांच्या आठवणी प्रत्येक क्षणी सोबत आहेत. त्यांनी दिलेले संस्कार, कष्टाची शिकवण, माणुसकीचा वारसा आणि प्रामाणिकपणाचे मूल्य आम्हाला आयुष्यभर मार्गदर्शन करत राहील.
भाऊ, तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही. पण तुम्ही दाखविलेल्या आदर्श मार्गावर चालण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. हीच तुमच्या पवित्र स्मृतीला खरी आदरांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
– महेश गो. हेब्बाळकर, शिक्षक, तिवोली
Belgaum Varta Belgaum Varta