Sunday , September 20 2026
Breaking News

डॉक्टर दिनानिमित्त इंजिनिअर-समाजसेवक प्रसाद पाटील यांचा केएलई संस्थेकडून गौरव

Spread the love

 

खानापूर : डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक योगदान दिल्याबद्दल गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे सदस्य व व्यवसायाने इंजिनिअर असलेले प्रसाद विठ्ठल पाटील यांचा केएलईच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. डॉक्टर नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या प्रसाद पाटील यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.

प्रसाद पाटील हे दर आठवड्याला सरासरी चार ते पाच गंभीर रुग्णांना वेळेत उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल करण्यासाठी मदत करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत खानापूर तालुका व परिसरातील 1,500 हून अधिक रुग्णांना वेळेत उपचार मिळून जीवदान मिळाल्याचे सांगितले जाते. तसेच विविध शासकीय व सामाजिक आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देत अनेक गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

रक्तदान क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांनी स्वतः 33 वेळा रक्तदान केले आहे. याशिवाय गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी अनेक रक्तदात्यांचे जाळे उभे करत शेकडो कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.

या सन्मान सोहळ्याला केएलई संस्थेचे संचालक डॉ. राजशेखर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर नवीन एम., जिल्हा मुख्य कुटुंब नियोजन अधिकारी डॉ. विश्वनाथ भोवी, मेडिकल सुपरिटेंडंट संजय कंबार, तसेच डॉ. श्रीकांत मैत्री, डॉ. अजय काळे, डॉ. खोत, डॉ. जमादार, डॉ. पोटे, डॉ. केदार, संस्थेचे विद्यार्थी, डॉक्टर, जनसंपर्क अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी समाजसेवक नागेश नार्वेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. राजशेखर यांनी डॉक्टरांनी रुग्णांशी संयमाने संवाद साधत दर्जेदार उपचार देण्याची गरज अधोरेखित केली. आजकाल अनेक रुग्ण इंटरनेट, गुगल किंवा ChatGPT यांसारख्या माध्यमांतून अपुरी माहिती घेऊन उपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना योग्य वैद्यकीय माहिती समजावून सांगणे ही डॉक्टरांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना प्रसाद पाटील यांनी खानापूर तालुक्यातून येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी उपचार खर्चात अधिकाधिक सवलत देण्याची विनंती केली. अनेकदा रुग्णांना दाखल करताना सुरुवातीचा खर्चही स्वतःच्या खिशातून करावा लागतो, त्यामुळे गरजूंसाठी विशेष मदत मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच केएलई रुग्णालयात न्यूरोलॉजी आणि कार्डियाक विभाग सुरू करण्याबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांसाठी फिरती आरोग्य बस उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. केएलई संस्थेने खानापूर परिसरातील सहा गावे दत्तक घेऊन तेथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभारही मानले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *