Sunday , July 26 2026
Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; शिंगणापूरसह १९ बंधारे पाण्याखाली, पंचगंगेची पाणीपातळी झपाट्याने वाढली

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून, गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सरासरी १९.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा, वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, शिंगणापूर, राजाराम, रुई, इचलकरंजी, सुर्वे, तेरवाड, शिरोळ, यवलूज, खडककोगे, हळदी, कोपार्डे, कोडोली यांसह जिल्ह्यातील एकूण १९ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

दरम्यान, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा शुक्रवारी सायंकाळपासून पाण्याखाली गेला असून, शनिवारी सकाळी तेथील पाणीपातळी २२.११ फूट इतकी नोंदविण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत.

मुसळधार पावसामुळे गडहिंग्लज–आजरा, आंबोली तसेच कोल्हापूर–गगनबावडा राष्ट्रीय महामार्गांवरील काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच चंदगडकडे जाणारी वाहतूक आजरा मार्गे वळविण्यात आली आहे.

राधानगरी धरणातून नदीपात्रात १६,३२२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, धरण क्षेत्रातही पाण्याची आवक वाढत आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार, १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात १६५.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीच्या ३८.५६ टक्के आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ६४१.१ मिमी पाऊस झाला असून, इतर तालुक्यांतही समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली आहे.

प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून अथवा पुराच्या पाण्यातून प्रवास करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Spread the love  आपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना कोल्हापूर : संभाव्य पूरस्थितीला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *