Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर; मलप्रभा नदी दुथडी भरून वाहू लागली

Spread the love

 

खानापूर : तालुक्यातील कणकुंबी, जांबोटीसह पश्चिम घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम मलप्रभा नदीच्या पाणीपातळीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. नदीच्या उगमस्थानी पावसाचा जोर कायम असल्याने मलप्रभा नदी वेगाने प्रवाहित होत असून, पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे.

जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या दमदार पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नद्या-नाले वाहू लागल्याने खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, शेतीकामांनाही वेग आला आहे.

कणकुंबीच्या घनदाट जंगल परिसरात अनेक लहान-मोठे धबधबे आणि ओढे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे परिसराचे निसर्गसौंदर्य अधिक खुलून आले असून, पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. मात्र, सततच्या पावसामुळे प्रशासनाने नागरिकांनी व पर्यटकांनी नदी, धबधबे आणि पूरग्रस्त भागांजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास नवीलतीर्थ जलाशयातील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *