Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूरात विजेचा लपंडाव कायम; विकासकामांवरही प्रश्नचिन्ह

Spread the love

 

‘जनता त्रस्त… लोकप्रतिनिधी मस्त’ म्हणत काँग्रेसची सत्ताधाऱ्यांवर टीका

खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. वीजपुरवठा, रखडलेली विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था, अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि सिंचन प्रकल्पांचा रखडलेला प्रश्न यावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरत “जनता त्रस्त… लोकप्रतिनिधी मस्त” अशी टीका करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या निवेदनानुसार, सुरुवातीला जांबोटी व लोंढा झेडपी परिसरापुरती मर्यादित असलेली वीजपुरवठ्याची समस्या आता संपूर्ण तालुक्यात पसरली आहे. जांबोटी-कणकुंबी परिसरात अनेकदा १५ ते १५ दिवस वीजपुरवठा खंडित राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, माजी आमदारांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या बैलूर आणि कोडचवाड येथील वीज उपकेंद्रांची कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. हलशी उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असले, तरी उर्वरित दोन्ही प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला.

निवेदनात सध्याचे आमदार आणि खासदार यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही तालुक्यासाठी मोठे विकास प्रकल्प आणण्यात अपयश आल्याचा आरोप करत, निवडणुकीतील आश्वासने आणि प्रत्यक्ष विकासकामांमध्ये मोठी तफावत असल्याचे म्हटले आहे.

तालुक्यातील ३० ते ४० रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचा दावा करण्यात आला असून, शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध नसल्याने त्यांना तासनतास बसस्थानकावर थांबावे लागत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. तसेच गेल्या तीन वर्षांत एकही उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण झालेला नसल्याचाही आरोप करण्यात आला.

दरम्यान, पंचहमी योजनेचे अध्यक्ष आणि सदस्यच सध्या युद्धपातळीवर काम करत असल्याचा दावा करत, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, या आरोपांवर संबंधित लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *