

खानापूर (प्रतिनिधी) : हत्तरगुंजी (ता. खानापूर) येथील गायरान जमिनीवर झालेल्या कथित अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी खानापूर तहसीलदारांकडे केली आहे. हलकर्णी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, हत्तरगुंजी गावच्या रि.स. क्र. २४ मधील एकूण १९ एकर ५ गुंठे क्षेत्रापैकी ११ एकर जमीन गायरान म्हणून राखीव आहे. या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून परजिल्ह्यातून आलेल्या काही हक्की-पिक्की (आदिवासी) समाजातील कुटुंबांनी सुमारे ३० झोपड्या उभारून वास्तव्य सुरू केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
गायरान जमीन ही हत्तरगुंजीसह हलकर्णी, गांधीनगर, मुडेवाडी, डुक्कुरेवाडी आणि इंदिरानगर या गावांतील जनावरांच्या चारण्यासाठी वापरली जाते. परिसरात वन विभागाची जमीन मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांना चराईसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
शेती आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी ही जमीन महत्त्वाची असून, अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाराईचा प्रश्न गंभीर बनल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वीही या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती; मात्र अद्याप अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
संबंधित गायरान जमिनीबाबत न्यायालयीन स्थगिती आदेश असून, जिल्हाधिकाऱ्यांनीही या जागेवर अतिक्रमण होऊ नये, असे निर्देश दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही बाहेरील जिल्ह्यांतील काही लोकांनी येथे झोपड्या उभारून वास्तव्य सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हलकर्णी ग्रामपंचायत हद्दीत सुमारे दहा हजार लोकसंख्या असून, गायरान जमिनीवरील कोणतेही अनधिकृत अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून अतिक्रमण हटवावे, अन्यथा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta