Sunday , September 20 2026
Breaking News

कृषी तलावात पडून प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कक्केरी परिसरात हळहळ

Spread the love

 

कक्केरी : कक्केरी येथील प्रगतशील शेतकरी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ (वय ५२) यांचा मंगळवारी सकाळी शेतातील कृषी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मल्लय्या हिरेमठ हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. शेतातील कृषी तलावाजवळ वाढलेले गवत व कचरा साफ करत असताना त्यांचा पाय घसरून ते तलावात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी भारती, मुलगी ऐश्वर्या आणि मुलगा अक्षय असा परिवार आहे. ऐश्वर्या बी.एस्सी. नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून, अक्षय डिप्लोमाच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. कुटुंबाचा आर्थिक भार पूर्णपणे मल्लय्या हिरेमठ यांच्यावर होता. त्यांच्यावर सरकारी बँक व कृषी पतसंस्थांचे पीककर्जही असल्याने कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

विशेष म्हणजे, शेतकरी हुतात्मा दिनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते यल्लप्पा गुपीत, रमेश वीरापूर, अश्पक अहमद पटेल, महांतय्या हिरेमठ, चेन्नवीरय्या हिरेमठ, अलेक्झांडर डिसोझा, मारुती पाटील, यल्लेशी कुंभारकोप, शिवाजी अंबडगट्टी आणि यल्लप्पा चन्नापूर यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शासनाकडून योग्य आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या घटनेची नोंद नंदगड पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *