Sunday , July 26 2026
Breaking News

नाथाजीरावांनी शिक्षणातून बहुजनांच्या उत्थानाचे कार्य केले

Spread the love

 

पत्रकार वासुदेव चौगुले : खानापूर मराठा मंडळ महाविद्यालयात स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

खानापूर : नाथाजीराव हलगेकर यांनी जातीपातीला थारा न देता बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर अपार कष्ट घेतले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मराठा मंडळ संस्थेचे नेटाने सारथ्य करत ज्ञानदानाचे प्रभावी जाळे उभे केले. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी ज्ञानप्रसाराचा प्रभावीपणे वापर केला असे मत पत्रकार वासुदेव चौगुले यांनी व्यक्त केले.

येथील मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात दिवंगत नाथाजीराव हलगेकर यांच्या 21 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या जे. बी. अंची होत्या.
श्री. चौगुले पुढे म्हणाले की, नाथाजीराव यांच्या दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि अथक परिश्रमामुळे संस्थेची झपाट्याने प्रगती झाली. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्णात रूपांतर व्हावे, त्याप्रमाणे नाथाजीरावांच्या नेतृत्वामुळे मराठा मंडळ संस्थेला नवे वैभव प्राप्त झाले. शिस्त, गुणवत्ता आणि संस्कार यांचा वारसा जपणारे अनेक शिक्षक मराठा मंडळ संस्थेने समाजाला दिले असून, त्यांच्या माध्यमातून सुदृढ समाज घडविण्याचे मोठे कार्य घडल्याचेही चौगुले यांनी नमूद केले. खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, त्या काळात गरीब व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी बेळगाव गाठावे लागत होते. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन कै. नाथाजीराव हलगेकर यांनी १९७९ मध्ये खानापूर येथे पहिले पदवी महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाची दारे खुली झाली आणि तळागाळातील समाजात शिक्षणाचा प्रसार होण्यास मोठी चालना मिळाली. नाथाजीराव यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संस्थात्मक कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या तरुण पिढीने समोर ठेवावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या प्रा. जे. बी. अंची यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा सर्वांगीण आढावा घेत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख दृष्टीकोन स्वीकारावा, असे आवाहन केले. प्रमुख वक्ते वासुदेव चौगुले यांच्या हस्ते कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आय. एम. गुरव यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राजश्री तिरवीर यांनी केले. या स्मृतिदिन कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ विजयालक्ष्मी तीर्लापूर, प्रा. कपिल गुरव, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *