
खानापूर : तालुक्यातील पंचहमी योजनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर मंगळवारी (ता.१) रोजी चोर्ला गावासाठी बससेवा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांसह महिला आणि कामगार वर्गाच्या सोयीसाठी सकाळच्या वेळेत बस सुरू करावी, अशी मागणी गॅरंटी योजनेच्या सदस्य प्रियांका गावकर यांनी योजनेच्या पहिल्या बैठकीपासून सातत्याने केली होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आले.
पंच हमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करीत संबंधित विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. तसेच खानापूर व बेळगाव येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चोर्ला परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्येची माहिती दिली. बससेवा सुरू करण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली होती. योजनेचे राज्य उपाध्यक्ष एस. आर. पाटील यांनीही बेळगावच्या डीटीओ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चोर्ला गावासाठी तातडीने बस सुरू करण्याची मागणी केली होती. संबंधित पत्राची प्रत राज्य अध्यक्ष व राज्य उपाध्यक्षांकडे पाठविण्यात आली होती. तसेच नुकत्याच झालेल्या गॅरंटी योजनेच्या बैठकीत दोन दिवसांत बससेवा सुरू न झाल्यास राज्य अध्यक्ष व उपाध्यक्षांकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला होता.
त्यानंतर चोर्ला गावासाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. सदर बस खानापूर आगारातून सकाळी ९.२५ वाजता बस सुटून १०.३० वाजता चोर्ला येथे पोहोचणार आहे. हा वेळ सध्या प्रायोगिक तत्त्वावर ठेवण्यात आला असून, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुढील काळात मार्ग व वेळ निश्चित करण्यात येणार आहे. बेळगाव मार्गे बस चालवायची की खानापूर-चोर्ला मार्गे, याबाबत नागरिकांच्या सोयीचा विचार केला जाणार आहे.
मंगळवारी बससेवा सुरू झाल्यानंतर गॅरंटी योजनेच्या सदस्या प्रियांका गावकर यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. यावेळी चालक व वाहकांचा हार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चिखले गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, धोंडीबा गावडे, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सीता सुतार, गणपत गावकर, रामा गावकर, महेश लक्ष्मण गावडे, लक्ष्मण नारायण गावकर, विमल गावकर, भागिरथी गेजम, सुलावंती गावकर, पार्वती गावकर यांच्यासह पंचमंडळी, महिला व अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
चोर्ला गावातील नागरिक, विद्यार्थी, महिला व कामगार वर्गाच्या वाहतुकीची अडचण दूर करण्यासाठी बससेवा सुरू केल्याबद्दल प्रियांका गावकर यांनी कर्नाटक सरकार, खानापूर आगारप्रमुख तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta