Sunday , September 20 2026
Breaking News

काँग्रेसच्या गॅरंटी योजनांतून खानापूर तालुक्याला ३ वर्षांत सुमारे ५५० कोटींचा थेट लाभ : डॉ. अंजली निंबाळकर

Spread the love

 

खानापूर : काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार राज्यभर लागू केलेल्या पंचहमी गॅरंटी योजनांचा गरीब, महिला, सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाला मोठा लाभ होत असून, खानापूर तालुक्यात गेल्या तीन वर्षांत या योजनांमुळे सुमारे ५५० कोटी रुपयांचा थेट आर्थिक लाभ जनतेला मिळाला आहे, असा दावा माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी केला आहे.
काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार राज्यभर पंचहमी गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. या योजनांचा सकारात्मक परिणाम गरीब महिला, सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गावर होत असल्याचे डॉ. निंबाळकर यांनी म्हटले आहे.
खानापूर तालुक्यातील आकडेवारीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, तालुक्यात सुमारे ६३ हजार महिलांना दरमहा प्रत्येकी २ हजार रुपयांचा थेट लाभ गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत मिळत आहे. त्यामुळे केवळ या एका योजनेतून खानापूर तालुक्यात दर महिन्याला अंदाजे १२.५० कोटी रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होत आहेत.
याशिवाय वीज बिलातील सवलतीमुळे तालुक्यातील नागरिकांना दरमहा साधारण १.५० ते २ कोटी रुपयांचा लाभ होत आहे. महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या मोफत बसप्रवासाच्या सुविधेमुळेही मोठी आर्थिक बचत होत असून, मोफत अथवा सवलतीच्या राशन योजनांचा लाभ वेगळाच असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंचहमी गॅरंटी योजनांचा एकत्रित विचार करता, खानापूर तालुक्यात दर महिन्याला साधारण १५ ते १६ कोटी रुपयांचा थेट आर्थिक लाभ सामान्य जनतेला मिळत असल्याचा दावा डॉ. निंबाळकर यांनी केला. या योजना गेल्या साधारण तीन वर्षांपासून सुरू असल्याने ३६ महिन्यांच्या कालावधीत खानापूर तालुक्यातील महिला आणि सामान्य जनतेला ढोबळमानाने ५५० ते ६०० कोटी रुपयांचा थेट लाभ मिळाल्याचे त्या म्हणाल्या.
“काँग्रेस जे बोलते, ते करून दाखवते,” असे सांगत डॉ. निंबाळकर यांनी काँग्रेस सरकार सामान्य जनतेला विविध योजनांच्या माध्यमातून थेट आर्थिक लाभ देत असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीच्या रकमेसंदर्भातही विविध प्रश्न उपस्थित झाले असून, सामान्य जनतेने दानरूपाने दिलेल्या पैशांच्या वापराबाबत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. काँग्रेस सरकारच्या योजनांमधून जनतेच्या खात्यात थेट लाभ पोहोचत असल्याने दोन्ही बाबींमधील फरक जनतेला स्पष्टपणे जाणवत असल्याचा दावा त्यांनी केला.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचा उल्लेख करत त्यांनी शिक्षण, वीज-पाणी व्यवस्था, धरणे, संशोधन केंद्रे, हरित क्रांती, धवल क्रांती आणि संगणक क्रांतीसह विविध क्षेत्रांतील विकासकामांचा उल्लेख केला.
केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना, देश आणि सामान्य जनतेच्या हितापेक्षा काही मोजक्या उद्योगपतींना फायदा करून देण्यावर अधिक भर दिला जात असल्याचा आरोपही डॉ. निंबाळकर यांनी केला.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *