








पालकमंत्र्यांचा कार्यक्रम, केडीपी बैठक, कुसमळी पाणी उपसा आणि वाळू प्रश्नावरून सवाल
खानापूर : तालुक्यातील विविध प्रश्नांवरून आमदारांवर टीका करताना माजी आमदार समर्थकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘पालकमंत्र्यांचा कार्यक्रम माजी आमदारांनी रद्द केला’ असा दावा कन्नड वृत्तपत्रातील बातमीत करण्यात आल्याचा उल्लेख करत, पालकमंत्र्यांची भेट घेऊन कार्यक्रम कोणी अडविला, हे स्पष्ट करून घ्यावे, असे आव्हान देण्यात आले आहे.
आमदार म्हणून अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, विकासकामांचा आढावा घेणे आणि जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे ही जबाबदारी असल्याचे सांगत, गेल्या तीन-साडेतीन वर्षांत किती केडीपी बैठका घेण्यात आल्या, असा सवाल करण्यात आला आहे. तालुक्यातील अधिकाऱ्यांची नियमित बैठक घेऊन कामांचा आढावा घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कुसमळी पाणी उपसा प्रकल्पावरूनही सवाल
कुसमळी पाणी उपसा प्रकरणावरूनही आमदारांना लक्ष्य करण्यात आले आहे. तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नावर प्रकल्पाला विरोध का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करत, जनतेच्या हिताविरोधात एखादा प्रकल्प राबविला जात असल्यास आमदार म्हणून त्याला विरोध करण्याची भूमिका का घेतली नाही, असा सवाल करण्यात आला आहे. या प्रकरणात ‘साटेलोटे’ असल्याचा आरोपही करण्यात आला असून, संबंधितांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यात जमिनी बळकावण्याच्या तक्रारी असल्याचा दावाही करण्यात आला असून, या प्रकरणात कोण सहभागी आहेत आणि त्यांचे राजकीय संबंध काय आहेत, याबाबत योग्य वेळी भूमिका मांडली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
वाळू वाहतुकीच्या मुद्द्यावरूनही टीका
वाळू वाहतूक बंद असल्याच्या आमदारांच्या भूमिकेवरही टीका करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षकांनी वाळू वाहतुकीवर कारवाई केली असल्याचे सांगत, निवडणुकीच्या काळात वाळू व्यावसायिकांना देण्यात आलेल्या कथित आश्वासनांचे काय झाले, असा सवाल करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘बिनाएंट्री वाळू सुरू करून देतो’, अशी आश्वासने दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांबाबत आमदारांची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
‘आता दुसऱ्यांवर खापर फोडण्याऐवजी कामाला लागा’
तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून विकासकामांचा पाठपुरावा करावा, अधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी करत, ‘दुसऱ्यांवर आरोप करून स्वतःची जबाबदारी झटकण्याऐवजी आमदारांनी कामाला लागावे,’ असा टोला टीकाकारांनी लगावला.
‘नाचता येईना, अंगण वाकडे’ या म्हणीचा उल्लेख करत आमदारांवर करण्यात आलेल्या या टीकेमुळे खानापूरच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार येण्याची शक्यता आहे.

Belgaum Varta Belgaum Varta