Sunday , November 22 2026
Breaking News

नेटबॉलमध्ये समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलची ऐतिहासिक भरारी!

Spread the love

 

खानापूरच्या चार संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; डॉ. सुरज पुन्नुचे यांच्याकडून ५० हजारांचे क्रीडा साहित्य भेट

खानापूर : खानापूर येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलने क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत नेटबॉलमध्ये जिल्हास्तरावरून आपल्या चार संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करून खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मधुगिरी जिल्ह्यातील कोल्टेक येथे दि. २३ ते २४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय डिपार्टमेंट स्पोर्ट्स स्पर्धेसाठी समर्थ स्कूलचे चार संघ रवाना होणार आहेत. या खेळाडूंना शाळेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी क्रीडाप्रेमी डॉ. सुरज पुन्नुचे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे ५० हजार रुपये किमतीचे स्पोर्ट्स ड्रेस तसेच इतर आवश्यक क्रीडा साहित्य भेट दिले. त्यांच्या या उदार देणगीबद्दल संस्थेचे सचिव डॉ. डी. नाडगौडा व चेअरमन एफ. एम. पाटील यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ. महेश कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पोर्ट्स कोच बाळकृष्ण हलगेकर आणि ॲडमिनिस्ट्रेटर दिव्या नाडगौडा यांच्या अथक परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना राज्यस्तरापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचा विकास, शिस्त, संघभावना आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे संस्थेचे सचिव डॉ. डी. नाडगौडा यांनी विशेष कौतुक केले.

खानापूर तालुक्यातील एका शाळेचे तब्बल चार नेटबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात आहेत, ही तालुक्यासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बाब आहे. या यशामुळे समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल झाले असून, तालुक्यातील विविध स्तरांतून खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन होत आहे.

विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून खानापूर तालुक्याचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केल्या.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीचे पैसे कर्जफेडीसाठी वळते केल्यास बँकांवर कारवाईचा इशारा

Spread the love  गॅरंटी योजनांच्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले; रेशन वितरणातील अनियमिततेवरही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *