खानापूर : सीमालढा अंतिम टप्प्यात असताना तालुक्यातील जनतेने एकजुटी दाखवून दिली पाहिजे. त्यासाठी सर्व मराठी भाषिक जनतेने समितीच्या झेंड्याखाली एकत्र येणे गरजेचे आहे. तसेच खानापूर समितीने एक सक्षम अध्यक्ष निवडावा ज्याला सीमाप्रश्नाचा सखोल अभ्यास असला पाहिजे. न्यायालयीन कामकाजाचा अभ्यास आहे. मराठी भाषिकांच्या समस्या परखडपणे मांडणारा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांच्या संपर्कातला संघटक वृत्तीचा नेता खानापूर समितीला अध्यक्ष म्हणून असावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड यांनी केले.
खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक राजा शिवछत्रपती स्मारकात काल झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नारायण लाड होते.
आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर प्रास्ताविक यशवंत बिर्जे यांनी केले.
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची उच्चधिकार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली तसेच दिनेश ओऊळकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले की, समितीची एकी अभेद्य राखुन खानापुरात समितीचा झेंडा निश्चितच फडकेल. सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढूया. खानापूर समितीमध्ये एकी झालेली असताना वैयक्तिक स्वार्थासाठी बेकी करणार्यांना बाजूला सारून सीमालढा तीव्र करूया व समितीचा बालेकिल्ला अबाधीत राखुया.
देवाप्पा गुरव म्हणाले की, एकीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असताना राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्या काही विघ्न संतोषी लोकांनी बेकीचे प्रयत्न चालू केले आहेत. त्यांना बाजूला सारून आपण प्रामाणिकपणे कामाला सुरुवात करूया.
यशवंत बिर्जे म्हणाले की, तालुक्यातील समितीच्या पुनर्बांधणीसाठी विभागवार बैठका घेऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.
पुंडलिक चव्हाण म्हणाले की, संघटनेच्या हितासाठी पूर्वीच्या दोन्ही गटप्रमुखांनी एखादा निर्णय घेतला तर त्यात व्यत्यय आणणे चुकीचे आहे.
विलास बेळगावकर म्हणाले की, समितीचा पराभव झाल्यामुळे मराठी माणूस एकाकी पडला आहे. भविष्यात एकजुटीने काम करून समितीचा झेंडा फडकवूया.
1 जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हिंडलगा येथे बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच त्रिसूत्रीय धोरणानुसार मराठीतून कागदपत्रे देण्यासाठी मध्यवर्ती समितीच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळीही आपण सर्वांनी उपस्थित राहण्याचे या बैठकीत ठरले. त्याचप्रमाणे 3 जुन रोजी मणतुर्गा येथे जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला परिसरातील समितीप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते देवप्पा गुरव व माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले आहे.
यावेळी प्रकाश चव्हाण, बाळासाहेब शेलार, आबासाहेब दळवी, चव्हाण, अनिल पाटील, विठ्ठल गुरव, चंद्रकांत देसाई, अर्जुन देसाई, रामचंद्र देसाई, मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर, विशाल पाटील यांनीही आपले विचार मांडले.
