तालुक्यात समितीमय वातावरण : तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई
खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमधून मिळावीत. सरकारी कार्यालयांवरील व बसेसचे बोर्ड गावांचे नाव फलक मराठीमध्ये असावेत. या मागणीसाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या 27 जून रोजी यशस्वी मोर्चा झाला. या मोर्चाची जनजागृती करण्याची संपूर्ण जबाबदारी ही मध्यवर्तीशी संलग्न असलेल्या घटक समितीची होती. त्यामुळे हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या नेतृत्वाखाली पंधरा दिवस आधी जनजागृती करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. गेल्या चार-पाच वर्षापासून समितीचा आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा संपर्क कोरोना व काही कारणाने झाला नव्हता त्यामुळे चांगले नियोजन करून कसबा नंदगड गावापासून या जनजागृतीच्या कार्याला गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. समितीचे ज्येष्ठ नेते पी. एच. पाटील यांच्या घरी आयोजित असणारी पहिली बैठक कसबा नंदगड गावच्या नागरिकांच्या आग्रहाखातर धार्मिक कार्यक्रमासाठी घातलेल्या मंडपात झाली आणि जनजागृतीचा श्रीगणेशा हा सहकार्य वातावरणात झाला. बऱ्याच निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन समितीच्या उमेदवाराला विजयी करण्याची मोलाची भूमिका बजावणाऱ्या कापोली या गावी सुद्धा अतिशय चांगले सहकार्य मिळाले. गावातील नागरिकना महामोर्चाबद्दल जनजागृती करून मराठीमध्ये कागदपत्रे मिळावीत यासाठी कायद्याच्या तरतुदीबद्दल माहिती देऊन युवकांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना समर्पक उत्तरे देऊन युवकांना सुद्धा समितीच्या कार्यात भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. अशाच पद्धतीने जांबोटी, ओलमनी या गावीसुद्धा चांगल्या तऱ्हेने जनजागृती करण्यात आली. मराठी भाषिकांमध्ये समितीबद्दल असलेली आपुलकी पुन्हा पाहायला मिळाली. आपल्या हक्काची माणसे आपले मौलिक अधिकाराचे जतन करण्यासाठी आलेत ही त्यांची भावना समजून आली. समितीच्या इतिहासातील आंदोलनाच्या काही आठवणी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितल्या. गावोगावी जाऊन समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी पत्रके वाटून जागृती करण्याचे आवाहन केले. जसजसे दिवस जात होते तसे या महामोर्चाच्या जनजागृतीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत गेला. नागुर्डा, कापोली, तिओली, शिरोली या गावातील सभांमुळे नागरिकांमध्ये असलेली समितीविषयी आपुलकी दिसली. या प्रत्येक सभेला समितीचे ज्येष्ठ व युवा नेत्यांनी आपापल्या कुवतीप्रमाणे योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी अध्यक्ष देवाप्पा गुरव, गोपाळराव पाटील, पी. एच. पाटील, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, निरंजन सरदेसाई, रणजीत पाटील, गावात जात असताना जिथे युवक दिसतील त्या ठिकाणी थांबून समितीबद्दलची सर्व माहिती देऊन कोर्टात असणाऱ्या दाव्याला रस्त्यावरची लढाई लढून कशा पद्धतीने मजबूत करता येईल हे सांगून उद्याच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन या सर्व युवक नेत्यांनी केले. गर्लगुंजी भागातील प्रत्येक गावात जाऊन ज्येष्ठ व युवा कार्यकरिणी सदस्यांनी ज्येष्ठ व युवकाना सीमा लढ्याबद्दल माहिती देऊन येणाऱ्या काळात कशा पद्धतीने एक संघटित असणे गरजेचे आहे हे सांगितले. येडोगा येथील कोपरा सभेमध्ये नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल एक वेगळेच चैतन्य जनजागृती करणाऱ्यांमध्ये निर्माण झाले. सीमा तपस्वी श्री. मष्णू पाटील यांच्या हलगा गावी धो-धो पावसामध्ये गावातील रोजगारानिमित्त गेलेल्या ज्येष्ठ महिलांनी व नागरिकांनी जनजागृती करण्यासाठी गेलेल्या समितीच्या कार्यकारिणी सदस्यांची आपुलकीने स्वागत करून पावसात सुद्धा सीमालढ्याचे व या महामोर्चाबद्दल विचार ऐकून घेतले. बऱ्याच गावामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या चन्नेवाडी या शिक्षकांच्या गावात निवृत्त शिक्षकांनी सरकारच्या मराठीवर होणाऱ्या अन्यायाचा व मराठी शिक्षकांना मिळणाऱ्या वागणुकीचा पाढा वाचला. तालुक्यातील बऱ्याच गावातील नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा उतारे यावर मराठीला स्थान नसल्यामुळे होणाऱ्या अडचणी सांगितल्या आणि या अडचणी मोर्चाद्वारे मांडाव्यात असे सांगून या मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला. ‘एक सीमावासीय लाख सीमावासीय’ घोषणेबरोबरच संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होण्याच्या घोषणांच्या गर्जना गावोगावी ऐकायला येऊ लागल्या. पंधरा दिवसात खानापूर तालुक्यातील 40 च्या वर गावामध्ये केलेल्या जागृती कार्यक्रमाची पोचपावती मोर्चा दिवशी खानापूर तालुक्यामधील नागरिकांनीही दाखवलेली उपस्थिती पाहून खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई आणि त्यांच्या कार्यकारिणीला मिळाली. आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये समिती विषयी असलेली आपुलकी आणि सीमा प्रश्नाबद्दल नागरिकांमध्ये असलेली तळमळ दिसून आली. योग्य नियोजन करून तालुक्यामध्ये महामोर्चा विषयी जनजागृती केल्यामुळे समितीच्या अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्याबद्दल कार्यकारिणी सदस्यांबरोबर तालुक्यातील नागरिकांमध्ये समितीला एक सक्षम अध्यक्ष लाभला ही भावना निर्माण झाली आहे. या संपूर्ण जनजागृती मोहिमेमध्ये समिती अध्यक्षांबरोबर सर्व कार्यकारिणी सदस्यांचे यामध्ये संभाजी देसाई, सूर्याजी पाटील, सुरेश देसाई, दत्तू कुट्रे, रवींद्र शिंदे, युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, विनायक सावंत, राजू पाटील, रामचंद्र गावकर, दिगंबर देसाई, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, राहुल पाटील व इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
